नवी दिल्ली – देशात करोनाने हाहा:कार माजवला आहे. दररोज तीन हजारांहून अधिक रुग्ण दगावत आहे. आरोग्य यंत्रणा देखील करोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर हतबल झालेली दिसत आहे. विविध क्षेत्रातील कोविड योद्धे करोना रुग्णांना बरं करण्यासाठी लढत आहेत. या कोविड योद्ध्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली आहे.
देशभरात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. सध्या संपूर्ण भिस्त आरोग्य कर्मचाऱ्यांवर असून पुढील काळात करोनाचे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर मात कऱण्यासाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्याचा मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. NEET-PG परीक्षा कमीत कमी 4 महिने पुढे ढकलली जावी, अशी सूचना मोदींनी दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाईल. ते म्हणाले की, त्यांच्या विभागाच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांनी कोविडशी संबंधित कर्तव्य केले पाहिजे. कोविड रुग्णांच्या सेवेत 100 दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय कर्मचारी यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल.