Accident | ऑक्सिजन बेड शोधण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; रुग्णासह 5 जणांचा मृत्यू

लखनऊ – उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर येथे आज (दि.3) दुपारी मोठी दुर्घटना घडली आहे. एक जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन बेड शोधण्यास निघालेल्या कुटुंबाच्या कारचा मोठा अपघात झाला. कारची झाडाला जोरदार धडक बसून अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. या घटनेत पती, पत्नी, मुलगा, दीर आणि कार ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहजहांपुर येथील रधोला गावातील जमुकादेवी यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. सोमवारी सकाळी उपचारासाठी कुटुंबीय त्यांना बरेली येथे घेऊन गेले. मात्र तेथे त्यांना ऑक्सिजन बेड न मिळाल्याने ते परत निघाले. शाहजहांपुर येथील हायवेवर बंथरा गावाजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडाला धडकली.

कारमध्ये जमुका देवी, त्यांचे पती नरेश राठोड, दीर हरिलाल, मुलगा, जावई आणि ड्रायरव्हर होते. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगोही येथील रधोला गावातील नरेश राठोड यांची पत्नी जमुकादेवी यांना रविवारी श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांची कोविड चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र त्यांच्यामध्ये कोविडची लक्षणे होती. सोमवारी कुटुंबीय त्यांना बरेली येथे घेऊन गेले. मात्र कोविड पाॅझिटिव्ह असतील तरच भरती करून घेण्यात येईल असे तेथील रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

त्यानंतर सर्व कुटुंबीय ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी शोधाशोध करत होते. मात्र त्यांना ऑक्सिजन बेड कुठेही मिळाला नाही. गंभीर परिस्थितीत कारमधून जमुकादेवी आणि सर्व कुटुंबीय शाहजहांपुर येथे येत होते त्याचवेळी बंथरा जवळ कार झाडाला धडकून अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.