सॅन फ्रान्सिस्को – कॅलिफोर्निया प्रांताच्या उत्तरेकडील भागाला सॅन फ्रान्सिस्कोच्या खाडीला वादळी पावसाने झोडपले आहे. यापूर्वीही कॅलिफोर्नियाला सागरी वादळ आणि अतिवृष्टीचा फटका बसलेला होता. त्यामुळे आताही अतिवृष्टी आणि पुराची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे रुप प्राप्त झाले आहे. नद्यांची पातळी वाढली आहे आणि पावसामुळे भूस्खलनही झाल्याच्या बातम्या मिळत आहेत. येत्या आठवड्यात आणखीन मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव देखील होण्याची शक्यता राष्ट्रीय हवामान संस्थेने वर्तवली आहे.
प्रशांत क्षेत्रातील पावसामुळे आणि हिमवर्षावामुळे भूस्खलनाचे प्रकार अनेकवेळा या बघायला मिळतात. काही दिवसांपासून कॅलिफोर्नियाच्या आजूबाजूच्या परिसराला अशा विचित्र वातावरणाला सामोरे यावे लागते आहे. अतिवृष्टी आणि हिमवर्षावामुळे या भागांमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रशांत क्षेत्रातील वादळ सोमवारी कॅलिफोर्नियाला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे कॅलिफोर्नियाच्या उत्तर आणि मध्य भागात बुधवारी 6 ते 12 इंच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी पूरामुळे जमिनीची धूप होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमेच्या किनाऱ्यावरून मोठ्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याचीही शक्यता आहे. गेल्या वर्षी 26 डिसेंबरला सॅन फ्रान्सिस्कोला 10 इंच पावसाने झोडपले होते.