तेहरान – इराणमध्ये देशर भडकलेल्या आंदोलनप्रकरणी आणखीन दोन आंदोलकांना फाशी देण्यात आले आहे. यामध्ये एक कराटे चॅम्पियन आणि मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या कोचचा समावेश आहे. मोहम्मद मेहदी करामी आणि सईद मोहम्मद हुसैनी अशी या दोघांची नावे असून त्यांना शनिवारी पहाटे फाशी देण्यात आले, असे सरकारी वृत्तसंस्तेने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
हे दोघेही गेल्या वर्षी हिजाबविरोधा आंदोलनात सहभागी झाले होते. 3 नोव्हेंबर रोजी करज भागात निमलष्करी दलाच्या एका सैनिकाची हत्या केल्याच्या ओरपाखाली या दोघांना दोषी ठरवण्यात आले होते.
करामी याला अखेरच्या इच्छेनुसार आपल्या कुटुंबियांशी भेटण्याची परवानगी देखील नाकरण्यात आली होती, असे त्याचे वकील मोहम्मद हुसैन अगासी यांनी सांगितले. आपल्या वकिलांनाही भेटू न दिल्याने करामी याने गेल्या आठवड्यात बुधवारपासून अन्नत्याग केला होता, असेही अगासी यांनी सांगितले.
सप्टेंबर महिन्यात माहसा आमिनी या युवतीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर भडकलेल्या आंदोलनप्रकरणी आतापर्यंत 4 जणांना फाशी दिले गेले आहे. आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी 41 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे काही प्रसिद्धीमाध्यमांनी म्हटले आहे. मात्र ही संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या सर्वांच्या फाशीला स्थगिती द्यावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने आणि युरोपीय संघाने इराणला केले आहे.