सलग तिसऱ्या दिवशी 100 पेक्षा अधिक बाधित आढळले
लॉकडाऊनची पुन्हा मागणी : गेल्या 24 तासांत 122 जणांना संसर्ग
राजगुरूनगर – खेड तालुक्यात करोनाचे तांडव सुरू झाले असून सलग तिसऱ्या दिवशी 100 पेक्षा अधिक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. यामुळे तालुक्यातील करोना रोखणे प्रशासनाच्या हाताबाहेर गेले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मागील 24 तासांत नव्याने 122 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
खेड तालुक्यात शुक्रवारी (दि. 28) 116, शनिवारी (दि. 29) विक्रमी 138 तर रविवारीही 122 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नागरिक खुले आम तालुक्यात फिरत असल्याने त्यातही मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळत नसल्याने करोनाला रोखता येत नाही. अनेकजण पुन्हा लॉकडाऊनची मागणी करीत आहेत.
तालुक्यातील बाधितांची संख्या 3197 तर मृतांचा अकडा 74 वर पोहोचला असून 2455 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 668 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
मागील 24 तासांत राजगुरूनगर (20), चाकण (17), आळंदी (19) या तीन नगरपरिषदांमिळून 56 तर ग्रामीण भागातील मेदनकरवाडी (9), खराबवाडी (18), निघोजे (3),आंबेठाण (1), खालूंब्रे (1), म्हाळुंगे (2), नाणेकरवाडी (2),कडाचीवाडी (1), चिंबळी (2), वडगाव घेनंद (1), धानोरे (1), भोसे (2),गोलेगाव (3), चिंचोशी (1), मरकळ (2), बुट्टेवाडी ), खरपुडी खुर्द (1), राक्षेवाडी (2), शिरोली (2), चास (4), पापळवाडी (1), कडूस (1), वेताळे (2), वाफगाव (1), गोसासी (1), जऊळके खुर्द (1) या 26 गावांत 66 असे एकूण 122 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.