दिवसा भंगार विकणे, रात्री रखवालदारी करून घेऊन दिला अँड्रॉइड मोबाइल
बेल्हे – करोनामुळे शाळा बंद असून शासनाने ऑनलाइन अभ्यास सुरू केला; परंतु काही पालकांची परिस्थिती अतीशय नाजूक आहे. त्या पालकांची अँड्रॉइड मोबाइल घ्यायची परिस्थिती नसल्याने त्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत; परंतु अतीशय गरीब परिस्थिती असताना केवळ आपण शिकलो नसलो तरी आपली मुलगी शिकली पाहिजे या हेतून प्रेरीत होवून एका पित्याने मुलीसाठी दिवसरात्र एक करून बचत केलेल्या रक्कमेतून एक नवीन फोन विकत घेवून दिल्यावर मुलगी अत्यंत भावनिक झाली होती.
मुळचे नेपाळमधील बोनियो (ता. धनगडी, जि. कैलाली) या ठिकाणाहून आलेले पदमसिंग विश्वकर्मा हे गेल्या 15 वर्षांपासून राजुरी (ता. जुन्नर) येथे राहत आहेत. स्वत:चे शिक्षण काहिहि नसताना भंगार गोळा करणे, मजुरी करणे, नाईट वॉंचमन अशी कामे करून ते उपजीविका करतात. त्यांची पत्नी तिही दम्याने आजारी असते. तर त्यांची कमल नावाची मुलगी राजुरी येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत आहे.
सध्या करोनामुळे मुलांचा अभ्यास ऑनलाइन सुरू असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल असणे आवश्यक आहे; परंतु पदमसिंग यांची परीस्थीती अतिशय हालाकीची असल्याने व त्याच करोनामुळे काहीच काम नाही त्यात मुलीकडे मोबाइल नसल्याने तिचे शिक्षण थांबले होते. आपल्या गरिबीमुळे आपण मुलीला ऑनलाइन शिक्षण घेता येईना म्हणून बापाचा जीव कासावीस झाला. पण काहिहि करून मोबाइल घ्यायचाच ही जिद्द गप्प बसू देत नव्हती. मग तीन महिने घरचे भागवून मोबाइलसाठी आठ-नऊ हजार बचत करणे हे गरिबांसाठी जरा अवघडच बाब होती. मग पदमसिंग यांनी दिवसा भंगार गोळा करून काही रक्कम गोळा केली तर रात्री गावातच ज्ञानदिप पतसंस्थेत रखवालदारी म्हणून काम करून तीन महिन्यांत नऊ हजारांची बचत करून कमलसाठी नवीन मोबाइल खरेदीकरून दिला. ज्यावेळी बापाने मुलीला मोबाइल दिला त्यावेळी दोघांचाही आनंद गगनातमावेनासा झाला होता.
- मुळची नेपाळी पण उत्तम मराठी
कमलाला मोठेपणी गायक व्हायचे आहे. ती जरी मुळची नेपाळी असली तरी तिला उत्तम मराठी येते. तिचे गवळणी मराठी अभंग तोंडपाठ आहेत. दरम्यान, तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी हभप विष्ण महाराज औटी यांनी उचलली आहे.