गेल्या दीड ते दोन वर्षांपासून करोनाने सगळे चक्र थांबवले आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे चित्रपट उद्योगालाही याचा फटका बसला आहे. देशातली दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असून आता काहीसे दिलासादायक चित्र निर्माण होऊ लागले आहे.
त्यामुळे निर्माता दिग्दर्शकांनीही धाडस करण्यात सुरुवात केली आहे. काही ठिकाणी चित्रीकरणास सुरुवात करण्याची तयारी केली जात आहे. मात्र लोकांमध्ये अजूनही करोनाचे भय असल्यामुळे त्याचा फटका बसताना दिसतो आहे.
मनोज वाजपेयीच्या एका चित्रपटाचे शूट उत्तराखंडमध्ये केले जाणार होते. नैनीतालच्या रामगढ ब्लॉकमध्ये सोनापानी या गावात त्याची तयारी केली जात होती. सेट उभारण्याचे कामही सुरू झाले होते. मात्र स्थानिक गावकऱ्यांच्या विरोधामुळे ते आता थांबवावे लागले आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आताशी कुठे करोनाचा धोका संपण्याच्या मार्गावर त्यात पुन्हा शूटिंग सुरू झाले तर ताप वाढणारच आहे.
एका व्यक्तीला जरी करोना झाला तर त्यामुळे संपूर्ण गावाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो अशी रास्त भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे गुरुवारी सेट उभारण्याचे सुरू करण्यात आलेले काम थांबवण्यात आले.
दरम्यान, मनोजच्या द फॅमिली मॅन 2 या वेबसिरीजलाही विरोधाचा सामना करावा लागतो आहे. तामिळनाडूत जोरदार विरोध केला जातो आहे. या वेबसिरीजमध्ये तमिळ लोकांचे चुकीचे चित्रण करण्यात आले असल्याचा तेथील नागरिकांचा आरोप आहे. या विरोधांमुळे मनोज गेल्या काही दिवसांत अकारण प्रसिद्धीझोतात आला आहे.