खोट्या टिमक्‍या वाजविणे बंद करा – विलास लांडे

पिंपरी – मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे काम अमक्‍याच्या प्रयत्नातून सुरु केल्याच्या टिमक्‍या ऐन निवडणुकीत वाजविल्या जात आहेत. वास्तविक कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात 240 एकरात प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र अवघ्या 100 एकरात गुंडाळले जाणार आहे. मात्र हे अपयश दडवून वाजविल्या जात असलेल्या खोट्या टिमक्‍या वाजविणे बंद करा, असे आवाहन भोसरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी विरोधकांना केले.

मोशी परिसरातील प्रचार फेरीत बोलताना विलास लांडे म्हणाले की, भोसरी मतदारसंघात सध्या खोटे बोल पण रेटून बोल, असा कारभार सुरु आहे. ज्या प्रकल्पाची वीटही रचली गेली नाही. अशा प्रकल्पांचे काम पूर्ण केल्याची फ्लेक्‍सबाजी “टिमकीबहाद्दरां’नी केली आहे. औद्योगिक प्रदर्शन केंद्र निधीअभावी अर्ध्यावर गुंडाळण्याची नामुष्की आली. त्यामुळे केंद्र उभारणीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जाणार आहे. ही माहिती दडवून ठेवत औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा प्रश्‍न सोडविल्याच्या खोट्या टिमक्‍या वाजविल्या जात आहेत. प्रदर्शन केंद्राचे काम सुरु झाल्याचा ढोल बडविला जात असताना हे काम अर्धवटच करण्यात येणार असल्याचे सत्य जनतेपासून लपविण्याचा उद्देश काय?, असा सवाल विलास लांडे यांनी केला.

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केला. 240 एकरात हे प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार होते. मात्र आता या केंद्राचा मूळ उद्देश बदलण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राऐवजी खुले केंद्र उभारण्यात येत आहे. मात्र ही माहिती मतदारांपासून दडविण्यात आली आहे.

उद्योगनगरी म्हणून ओळखले जात असलेले पिंपरी-चिंचवड शहर ऑटोमोबाईल हब म्हणूनही जगभरात नावारुपास आले आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांसाठी पूरक असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा आपला संकल्प होता. मात्र, सत्ता बदलानंतर प्रदर्शन केंद्राचा खर्च प्राधिकरणाने करावा, असे आदेश भाजप सरकारने दिले. त्यामुळे प्रकल्पाच्या उभारणीत आडकाठी आल्याचे लांडे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.