राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे मतदारांना आवाहन
हडपसर – गेल्या पाच वर्षांपासून आपण भाजप-शिवसेनेचं सरकार पाहात आहोत. मतं मिळवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करतात आणि निवडून येतात. मी सुद्धा 15 वर्षांच्या सत्ताकाळात 3 वेळा सरकारमध्ये काम केलं. पण, पैसे देऊन मंत्रिपद मिळवणारी माणसं मी पाहिली नव्हती. अशी माणसं जनेतची कामं काय मार्गी लावणार, अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ ते हडपसर येथे रॅलीत सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून हडपसरचा विकास खुंटला आहे. इथल्या आमदारांनी काय केले, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. वाहतूक कोंडी, कचरा, पाणी, रस्त्यांची दुर्दशा यावर हे बोलायला तयार नाही. न केलेल्या कामांचा डंका वाजवायचा, जाहिरातबाजी करायची इथवरच यांची मजल आहे.
हडपसरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. स्व. विठ्ठल तुपे यांचे विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर आहेत, हे त्यांच्या नगरसेवक म्हणून केलेल्या कार्यातून दिसून येतेच. हीच ताकद त्यांना विधानसभेत काम करायला मिळाली, तर निश्चितच हडपसरला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जातील, यात मला शंका वाटत नाही.
शरद पवार यांनी राज्य पिंजून काढत राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण केले आहे. 80 वर्षांचा योद्धा पडत्या पावसाची तमा न बाळगता लोकांशी संवाद साधतो आहे. त्यांच्या सादेस प्रतिसाद देत हडपसरनेही चेतन तुपेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहनही पवार यांनी केले.