31 ठिकाणी नाकाबंदी; 246 गुन्हेगारांची तपासणी
पिंपरी – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 19) “ऑपरेशन ऑल आऊट’ कारवाई दरम्यान पोलिसांनी शनिवारी जोरदार कारवाई केली. शहरात तब्बल 31 ठिकाणी नाकाबंदी केली. तसेच ठिकठिकाणी कोम्बिग ऑपरेशन करीत 245 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
आगामी निवडणूका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई आदेशानुसार आत्तापर्यंत 42 ठिकाणी कोम्बिग ऑपरेशन करण्यात आले आहे. मात्र शनिवारी एकाच दिवशी पोलिसांनी जोरदार कारवाई केली. प्रचार संपल्यावर पैसे वाटप केले जात असल्याच्या तक्रारी येतात.
वाटपासाठी पैशाची ने-आण होऊ नये म्हणून शहरी भागात अचानक 31 ठिकाणी नाकाबंदी केली. तसेच झोपडपट्टी भागात कोम्बिग ऑपरेशन करीत 246 गुन्हेगारांची पुन्हा तपासणी केली. मिळालेल्या सराईत गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात आणून बसवून ठेवण्यात आले. यामुळे शहरातील गुन्हेगारांची एकच पळापळ झाली.
म्हाळुंगेत हातभट्टी उद्धवस्त
अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत हातभट्टी जेसीबीच्या सहाय्याने उद्धवस्त केली असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिली. या कारवाईमध्ये आठ लाख 45 हजार रुपयांची दारू आणि रसायन नष्ट करण्यात आले.
आळंदीतही कारवाई
आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने दारूच्या दोन हातभट्ट्या उद्धवस्त करीत एक लाख 32 हजार रुपयांची दारू आणि रसायनाचा साठा नष्ट केल्याची माहिती पोलिसांनी दिली.