बीड – राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री करुणा शर्मा यांच्या घराजवळच ही घटना घडली. हल्लेखोरांनी करुणा यांच्या कारच्या काचा फोडल्या. तसेच कारचे दरवाजे उघडण्याचाही प्रयत्न केला, असे यासंबंधीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
करुणा शर्मा यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, करुणा शर्मा यांच्या गाडीवर बुधवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास 3 अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली.
करुणा शर्मा बीड शहरातील कॅनॉल रोडवरील उत्तमनगर भागात राहतात. बुधवारी रात्री त्या आपल्या गाडीतून पीए अजयकुमार देडे यांच्यासह मेडीकलवरून थायरॉईडचे औषध आणण्यासाठी निघाल्या होत्या. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर गाडीचे टायर पंक्चर असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.
त्यामुळे त्या परत घरी जाण्यासाठी निघाल्या. पण तेवढ्यात 3 अज्ञात इसम तिथे आले. त्यातील एकाने त्यांच्या गाडीच्या समोरील काचेवर दगड मारला. त्यात काच फुटली. त्यानंतर इतर दोघांनी त्यांच्या कारचे दोन्ही बाजुचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शर्मा यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांनीही करूना यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती.