पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका महिलेची तब्बल ६७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी, मोहम्मदवाडी येथील ५४ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार व्हॉटस्अप ग्रुप प्रोफेसर कुणाल सिंग, मॅनेजर लिंडा मेहता, असिस्टंट आशीष आरोन, ग्रुपचे अॅडमीन लिंकधारक, विविध बँक खात्यांचे वापरकर्ते यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १० जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत घडली आहे.
फिर्यादी महिला या गृहिणी आहेत. इंस्टाग्रामवर सर्फिंग करीत असताना, त्यांना शेअर्स स्टॉक्स गुंतवणूसंदर्भात सायबर ठगांनी एक लिंक पाठली. त्यानुसार फिर्यादींना एका ग्रुपमध्ये अॅड करून त्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जादा नफ्याचे प्रलोभन दाखविले. त्यातून त्यांनी गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक केली.
दरम्यान, गुंतवलेली रक्कम परत देण्यासाठी जादा पैसे मागितले. गुंतवणूक केलेले पैसे तरी परत मिळतील, या आशेने फिर्यादींनी थोडे थोडे करत सायबर चोरट्यांच्या खात्यात ६७ लाख जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.