निमसाखर – इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील बीकेबीएन रस्त्याची अवस्था खड्ड्यांमुळे दयनीय झाली आहे. संबंधित खात्याकडून खड्डे काही प्रमाणात बुजवले आहेत. मात्र, अनेक भागात हे खड्डेच बुजवले नसल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बारामती – कळंब – बावडा-नरसिंहपूर राज्यमार्गाची अनेक वर्षांपासून अवस्था बिकट झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे की खड्ड्यात रस्ता अशीच झाली आहे. बावडा ते बारामतीसाठी पूर्वी रस्ता झाल्यानंतर मात्र काही वर्षांनी बीकेबीएन रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. यानंतर प्रमुख जिल्हा महामार्ग म्हणून रस्त्याची ओळख झाली आहे. त्यामुळे त्याकाळी अल्प निधीतून रस्त्याची देखभाल होत होती.
मात्र दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा प्रमुख मार्गावरून या रस्त्याची राज्य मार्ग म्हणून बढती मिळूनही सध्या या रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे तर काही ठिकाणी एकेरी वाहतूक करावी लागत आहे. सध्या नीरा भीमा कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व भवानीनगर येथील छत्रपती कारखाना सुरू आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होत आहे.
त्यामुळे परिसरात बऱ्याचवेळा लहान मोठे अपघात घडले आहेत. या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र, सध्या साधारण दोन आठवडे उलटून गेले तरी खड्डे बुजविण्याचे काम थांबले असल्याचे दिसून येत आहे.