ऊस उत्पादकांची अजूनही लूट

संग्रहित छायाचित्र....

“यशवंत’ बंदमुळे शेतकरी देशोधडीला : परप्रांतीयांची गुऱ्हाळघरे, हवेलीबाहेरील कारखान्यांवर भिस्त

– सचिन सुंबे

सोरतापवाडी – एकेकाळी हवेली तालुक्‍याचे वैभव असलेला थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे कोट्यवधी रुपयांच्या कर्जात बुडाला. शेतकरी आणि कामगारांची परवड सुरू आहे. हवेलीतील हक्‍काचा कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळत नाहीत. पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कामगारांचे जीवन धुळीस मिळाले आहे. यशवंत बंद झाल्यानंतर आजतागायत ऊस उत्पादकांची लूट सुरूच आहे.

हवेलीबाहेरील कारखाने आणि दौंड तालुक्‍यातील गुऱ्हाळघरांवर भिस्त ठेवावी लागत आहे. हा कारखाना रसातळाला गेला आहे. कारखान्यावर सर्व राजकीय पक्ष फक्‍त निवडणुकीसाठी उपयोग करीत आहेत. सभासदांना फक्‍त आश्‍वासनाचे गाजर दाखवत आहेत. सभासदांच्या स्वप्नावर पाणी पडले आहे. सभासद देशोधडीला लागला आहे.

स्व. आण्णासाहेब मगर तसेच स्व. मणिभाई देसाई यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली सहकारी तत्वावर हा कारखाना सुरू करण्यात आला. 20 हजारांवर सभासद संख्या असलेला व हजारांवर कामगार संख्या असलेला हा कारखाना महाराष्ट्रात दोन नंबरला होता. जास्त साखर उतारा, उसाची वाहतूक जवळ व उत्पादन खर्च कमी म्हणून प्रसिद्ध होता. आज 10 ते 15 हजार एकर क्षेत्रावर ऊस आहे. कारखाना बंद पडल्यानंतर हवेली तालुक्‍यातील ऊस गाळपासाठी इतर कारखान्याच्या अधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागत आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, दौंड, बारामती तालुक्‍यांतील कारखान्यांना ऊस कमी पडत होता म्हणून ते ऊस घेऊन जात होते. पण शिरूर व दौंड वगळता इतर तालुक्‍यात ऊस क्षेत्र वाढल्यामुळे ऊस गाळप बंद केले आहे. गेटकेन उसामुळे कमी बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी गुऱ्हाळ व कुट्टीला ऊस देत आहे. याचा फायदा परप्रांतीय गुऱ्हाळवाले घेत आहेत. तिथे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उसाकडे पाठ फिरवली आहे.

पावसाचे कमी प्रमाण, उसावर पडलेला लोकरी मावा, आदी कारणामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. त्यात हवेलीतील शेतकऱ्यांना हक्‍काचा कारखाना नाही. एक ते दोन एकर क्षेत्र असलेला शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळला आहे. हक्‍काचा कारखाना बंद पडल्याने शेतकरी अनेक सुविधांपासून कोसो दूर राहिला आहे.

भंगारात कारखान्याचा चोरीचा माल
यशवंत कारखाना रस्त्यावर मुरूम टाकण्याचे आता बंद झाले आहे. लग्नकार्यात मिळणारा ऍडव्हान्स कारखाना बंद असल्यामुळे मिळत नाही. आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या चोऱ्या झालेल्या आहेत. नुकताच दीड ते दोन टन वजनाचा शॉप्ट ढकलत नेण्यात आल्याच्या खुणा दिसत होत्या. मागील निवडणुकीच्या प्रचारात यशवंतभोवती नेतेमंडळींनी आश्‍वासनाचा पिंगा घातला. कोणी म्हणाले, 100 दिवसांत सुरू करतो. कोणी म्हणाले एकदा सत्ता द्या, यंदाच गाळप सुरू करू. पण कारखाना कोणी सुरू केला नाही. हीच यशवंत कारखान्याच्या सभासदांची शोकांतिका ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)