स्टिरॉईड सेवन धोक्‍याचेच!

स्टिरॉईडच्या अतिसेवनाने एका 23 वर्षाच्या मुलाचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच उघडकीस आली. शरीर सौष्ठव कमवण्यासाठी मुंब्रा येथील नावेद जमील खान हा तरुण स्टिरॉईडचे सतत सेवन करीत होता. या तरुणाला दररोज व्यायामाची सवय होती. शरीर सौष्ठव कमवण्यासाठी तो व्यायामासोबत स्टिरॉईड देखील घेत होता. या स्टिरॉईडमधील ग्लुकोकॉट्रीकॉईड्‌स या संप्रेरकामुळे या तरुणाच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले. त्यामुळे या तरुणाची फुफ्फुसे खराब झाली. फुफ्फुसे खराब झाल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

शरीर सुदृढ ठेवायचे असेल तर दररोज व्यायाम करावाच. व्यायामाची सवय चांगलीच आहे, पण कमी वेळेत जास्त व्यायाम करून शरीर सौष्ठव कमवणे, चित्रपटातील हीरोंप्रमाणे सिक्‍स पॅक बनवणे ही हल्ली फॅशन बनली आहे. त्यासाठी आजची तरुण मुले आहारासोबत सप्लिमेंटचा सर्रास वापर करतात त्यासाठी ते सप्लिमेंट म्हणून स्टिरॉईड खातात. हे स्टिरॉईड फार्मसिस्ट किंवा जिम इन्स्ट्रक्‍टरच्या सल्ल्याने घेतात. पण स्टिरॉईड घेताना डॉक्‍टरांचा सल्ला घेत नाही. त्यामुळेच तरुणांच्या शरीरावर स्टिरॉईडचा साईड इफेक्‍ट होतो. स्टिरॉईड सारखे सप्लिमेंट घेताना डॉक्‍टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. कारण प्रत्येकाची शरीरयष्टी एकसारखीच नसते. आपल्या शरीराची ठेवण ही आपल्या आई वडिलांच्या जीन्सवर अवलंबून असते. त्यातही लहानपणापासून आपण काय खातो, आहार कशा पद्धतीचा घेतो. कोणत्या प्रकारचा आहार आपल्या शरीराला मानवतो, कोणत्या प्रकारचा व्यायाम आपण करतो यावर आपल्या शरीराची ठेवण ठरते. या सर्व बाबींचा विचार न करता झटपट बॉडी बिल्डर होण्यासाठी आजचे तरुण स्टिरॉईड सारख्या घातक पदार्थांचे सेवन करतात.

शरीर कमवण्याच्या नादात जे मिळेल ते औषध घेऊन शरीरावर प्रयोग करीत राहतात. त्यातूनच असे प्रकार घडतात. जिममध्येही आपल्या शरीराला मानवेल, झेपेल यापेक्षा अधिक व्यायाम करतात. शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने एका मुलाचा जिममध्येच मृत्यू झाल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो याचे भान तरुणांनी ठेवावे. मुंब्रा सारख्या दुर्दैवी घटना थांबवायच्या असतील तर साधे सोपे उपाय करता येऊ शकतात. जीम मध्ये व्यायाम करायचा असेल तर आपल्याला झेपेल इतकाच व्यायाम करावा.

डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच सप्लिमेंट घ्यावे. आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपल्या शरीराला मानवेल असा आहार घ्यावा. शरीर सुदृढ ठेवायचे असेल तर जीममध्येच जावे असे काही नाही घरी सूर्यनमस्कार, योगासने करूनही शरीर सुदृढ व लवचिक ठेवता येते. घरच्या घरी दंड- बैठकासारखा व्यायामही करता येऊ शकतो. चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे, दोरी वरच्या उड्या मारणे यासारख्या व्यायाम प्रकारांनीही शरीर सुदृढ राहते. पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरांत ग्रीन जीम, ओपन जिम असतात त्या ठिकाणी जाऊन आपण व्यायाम करू शकतो. शेवटी शरीर कमावणे, तंदुरुस्त राहणे, शरीर सुदृढ राखणे हाच उद्देश प्रत्येक तरुणांचा असतो. वरील प्रकारचे व्यायाम करुन तो उद्देश सध्या होऊ शकतो.

-श्‍याम बसप्पा ठाणेदार

Leave A Reply

Your email address will not be published.