मुंबई – अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. अजित पवार यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते मंडळी शिंदे-फडणवीस सरकारसोबत गेले आहेत. तर काही विश्वासू नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही . त्यातील एक म्हणजे शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे हे आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शरद पवारांच्या बैठकीतही ते सामील झाले होते. यानंतर आता शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.
शरद पवार यांनी आगामी निवडणुकांकरिता खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल कोल्हे यांना सदर नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी खा. सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, पालघर जिल्हा अध्यक्ष आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले हे उपस्थित होते.
अमोल कोल्हे यांनी नियुक्तीनंतर ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली. माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब, महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो! आपण सर्वांनी दाखविलेला हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल!”
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली. माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब, महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे… https://t.co/C0uCtZQmBg
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 11, 2023
दरम्यान, अजित पवार 2 जुलै रोजी अजित पवार आणि इतर 8 आमदार मंत्रिपदाची शपथ घेत सत्तेत सामील झाले. यानंतर अमोल कोल्हे अजित पवार यांची साथ देणार की शरद पवार यांची साथ देणार हा प्रश्न निर्माण झाला. मात्र ट्वीटद्वारे त्यांनी “मी साहेबांसोबत” असल्याचं जाहीर केले होते. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिल्यानंतर आता त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.