पुणे – केंद्रीय गृहमंत्री यांचा ’बेस्ट पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन पुरस्कार’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन प्राचार्य तसेच सध्याचे परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांना गौरविण्यात आले.
राज्यातील अराजपत्रित अधिकार्यांसाठीचे भारतातील पश्चिम प्रादेशिक विभागासाठी (महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिव दमन ) सन 2020-21 या वर्षाचे ’युनियन होम मिनिस्टर ट्रॉफी फॉर बेस्ट पोलिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. राज्याच्या मुंबई येथील पोलीस मुख्यालयात खंडाळा प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन प्राचार्य व पुणे शहर पोलीस उप आयुक्त परी 4 शशिकांत बोराटे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अराजपत्रित अधिकार्यांसाठी सन 2021-22 मध्ये अभ्यासक्रम, प्रशिक्षण, प्रशिक्षणाच्या सोयी सुविधा, पायाभूत सुविधा तसेच इतर अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वसतिगृहातील सोयी सुविधांसह स्मृती संग्रहालय प्रेरणा परिषद परिसंवाद कक्ष, गांडूळ व कंपोस्ट खत प्रकल्प, महिला प्रशिक्षणार्थीसाठी सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन व्यायाम शाळा, अभ्यासिका, करमणूक आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
“यापूर्वी खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राला पोलीस शिपाई यांचे प्रशिक्षणाबाबत केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण पदक, पोलीस महासंचालक यांचे आदर्श प्रशिक्षक पुरस्कार मिळालेले आहे. परंतु अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठीचे प्रशिक्षणासाठी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून महाराष्ट्रातील पहिले प्रशिक्षण केंद्र ठरले आहे. अपर पोलिस महासंचालक संजय कुमार आणि विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सेनगावकर यांच्या मार्गदर्शनामुळे हा पुरस्कार मिळाला”, असे पोलिस उपायुक्त परिमंडळ 4 चे शशिकांत बोराटे म्हणाले.