हडपसर (विवेकानंद काटमोरे) –महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर आता मतदारांसह कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष हरकती व सूचना नोंदविण्यासाठी पुढे येतात. यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था केली आहे. मात्र, अनेक नगरसेवक व इच्छुक नव्या प्रारूप प्रभाग रचनेविषयी दुसऱ्या दिवशीही संभ्रमात आहेत.त्यामुळे हडपसर क्षेत्रीय कार्यालयात एकही सूचना व हरकत आलेली नाही.
महापालिकेच्या 58 प्रभागांची रचना मंगळवारी (दि.1) जाहीर झाली. गेल्यावेळी चार सदस्यांचा प्रभाग होता तर यावेळी तीन सदस्यांचा प्रभाग आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभागांची तोडफोड करण्यात आली आहे, त्याचा फटका विद्यमान नगरसेवकांना बसणार आहे तर एकाच सोसायटीची, वस्तीची विभागणी दोन प्रभागात झाल्याने तेथील नागरिकांनाही हरकत घेता येणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नियोजनानुसार 1 ते 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना करता येणार आहे. त्यावर 26 फेब्रुवारीपर्यंत सुनावणी घेऊन त्याचा अहवाल 2 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला पाठवावा लागणार आहे. त्यानंतर आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. महापालिकेने हरकत व सूचना नोंदविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था केली आहे. नागरिकांना अर्जाद्वारे हरकत किंवा सूचना सादर करावी, त्याची तेथील नोंदवहीमध्ये नोंद घेतली जाईल. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी एकही हरकत किंवा सूचना आलेली नाही, असे पलिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले.
पाच प्रभागांसाठी…
प्रभाग क्र. 22 : मांजरी-शेवाळेवाडी, प्रभाग 23 : साडेसतरानळी – आकाशवाणी, प्रभाग 24 : मगरपट्टा- साधना विद्यालय, प्रभाग 25 : हडपसर गावठाण-सातववाडी, प्रभाग 45 : फुरसुंगी या नवीन पाच प्रभागांसाठीच्या हरकती व सूचना हडपसर क्षेत्रीय कार्यालयात असलेल्या निवडणूक कक्षात सकाळी दहा ते संध्याकाळी सहा यावेळेत नोंदविता येतील, नोंदवलेल्या हरकती व सूचना दररोजच्या रोज मुख्य निवडणूक उपआयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत.
नव्याने केलेल्या प्रारूप प्रभाग रचना व त्यांची हद्द अद्यापही नगरसेवक व इच्छुक यांच्या लक्षात येत नाही. त्यातील अनेक नगरसेवक व इच्छुकांनी आज दिवसभर क्षेत्रीय कार्यालयात प्रत्यक्ष येऊन नविन प्रभाग रचना समजून घेण्याचा प्रयत्न केला.
– प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त, हडपसर