लाहोर – पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना यांचा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वदर येथे असणारा पुर्णाकृती पुतळा उद्ध्वस्त करण्यात आला. पाकिस्तानात बंदी असलेल्या बलुच लिबरेशन फ्रंटने रविवारी बॉम्ब टाकून हा पुतळा उडवल्याची जबावदारी स्वीकारली आहे.
हा भाग सुरक्षित असल्याचे वाटल्याने या भागात यावर्षीच्या सुरवातीला हा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याखाली स्फोटके ठेवून त्याचा स्फोट घडवून हा पुतळा उद्ध्वस्त करण्यात आला, असे वृत्त पाकिस्तानातील आघाडीचे दैनिक डॉनने दिले आहे.
पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या जीनांचा गौरव कैद ए आझम असा केला जातो. स्वातंत्र्य लढ्यात “द्वि धर्म द्वि राष्ट्र’ ही संकल्पना मांडत त्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली होती. पाकिस्तानात समाविष्ट होण्यास बलुचिस्तानचा पहिल्यापासून विरोध होता.
बलुचिस्तानला हिंसाचाराचा गेल्या अनेक वार्षांचा इतिहास आहे. पाकिस्तानमधून स्वतंत्र होत स्वतंत्र बलुचिस्तानची त्यांची प्रमुख मागणी आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानी सैनिकांवर झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी पाकिस्तानी चेकपोस्टही उद्ध्वस्त करण्यात आली.