राज्यात अत्याधुनिक वाहन तपासणी केंद्रे

11 परिवहन कार्यालयांतर्गत उभारणी करणार

पुणे – वाहनांची तपासणी स्वयंचलित पद्धतीने होण्यासाठी येत्या काळात राज्यात अत्याधुनिक वाहन तपासणी केंद्रे उभारण्यात येणार आहे. राज्यात 11 परिवहन कार्यालयांतर्गत ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड कार्यालयांचाही समावेश आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी, बसेस, रिक्षा, आदींसह व्यावसायिक आणि अवजड वाहनांची तपासणी होते. मात्र, मागील अनेक वर्षांपासून ती “मॅन्युअली’ होत आहे. त्यामुळे आता यामध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आणि अचुकता येण्यासाठी या केंद्रांचा उपयोग होणार आहे.

अद्ययावत तपासणीसाठी परिवहन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. आगामी काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड कार्यालयांतर्गत हलक्‍या वाहनांच्या तपासणीसाठी प्रत्येकी 2 आणि जड वाहनांसाठी प्रत्येकी 2 मार्गिका प्रस्तावित आहेत. यामध्ये दिवे (पुरंदर), आळंदी रस्ता, भोसरी आदी ठिकाणांचा समावेश आहे. मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, ठाणे आदी शहरांमध्येदेखील ही केंद्रे प्रस्तावित आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांचे ब्रेक, प्रदूषण, चाके, स्टेअरिंग आदी तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येते. वाहन नोंदणी करताना आणि वाहन प्रकारानुसार ठराविक वर्षांनुसार वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी वाहनांना प्रमाणपत्रदेखील देण्यात येते. आतापर्यंत ही तपासणी मोटार वाहन निरीक्षकांसह आरटीओचे कर्मचारी करत होते. मात्र, येत्या काळात स्वयंचलित यंत्रणेद्वारे ही तपासणी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.