अरत्रिका बिस्वासचा सुवर्ण धडाका कायम

राज्यस्तरीय सबज्युनिअर-ज्युनिअर जलतरण स्पर्धा

पुणे – पुण्याच्या अरत्रिका बिस्वासने महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटाच्या राज्यस्तरीय जलतरण अजिंक्‍यपद स्पर्धेत 11 वर्षांखालील मुलींच्या गटात तिहेरी यश मिळवले. पुण्याच्या शाल्मली वाळुंजकरने 17 वर्षांखालील मुलींच्या गटात दोन सुवर्णपदके पटकावली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील जलतरण तलावावर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या 11 वर्षांखालील मुलींच्या 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये अरत्रिकाने अव्वल क्रमांक पटकावला. तिने 1 मिनिटे 27.21 सेकंद वेळ नोंदवली. नाशिकची ऋजला कुलकर्णी (1 मि. 28.73 से.) दुसऱ्या, तर मुंबईची सानिका नवरे (1 मि. 30.57 से.) तिसऱ्या स्थानावर राहिली.

यानंतर अरत्रिकाने 11 वर्षांखालील मुलींच्या 50 मीटर फ्रीस्टाइलमध्येही सुवर्णपदक पटकावले. तिने 31.13 सेकंद वेळ नोंदवली. तिने मुंबईच्या आरुषी शर्मा (32.32 से.) आणि ठाण्याच्या रसिका नादरला (32.73 से.) मागे टाकले. पहिल्या दिवशी अरत्रिकाने 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर 17 वर्षांखालील मुलींच्या गटाच्या 800 मीटर फ्रीस्टाइलमध्ये पुण्याच्या शाल्मली वाळुंजकरने 10 मिनिटे 30.21 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक ठरले. हे तिचे या स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक ठरले. पहिल्या दिवशी शाल्मलीने 1500 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
स्पर्धेतील 11 वर्षांखालील मुलींच्या 50 मीटर बॅक स्ट्रोकमध्ये पुण्याच्या तन्मय डोळसने 38.60 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले.

17 वर्षांखालील मुलांच्या 200 मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात पुण्याच्या साहील गणगोटेला (2 मि. 20.10 से.) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 14 वर्षांखालील मुलांच्या 200 मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात पुण्याच्या तनिष कुडलेने (2 मि. 29.83 से.) रौप्यपदक, तर आरुष बधेने (2 मि. 31.24 से.) ब्रॉंझपदक जिंकले. मुंबईच्या आदित्य शहाने (2 मि. 29.62 से.) सुवर्णयश मिळवले. यानंतर तनिषने 200 मीटर बटरफ्लायमध्ये 2 मिनिटे 23.77 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या वरुण चव्हाणने (34.98 से.) सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलींच्या 100 मीटर बटरफ्लायमध्ये पुण्याच्या नंदिनी पेठकरने (1 मि. 07.98 से.) रौप्यपदक मिळवले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.