पणजी – गोव्यातही कॉंगेसचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच कॉंग्रेस पक्षाचे कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार क्लाफासियो डायस यांनी कॉंग्रेसचे चार आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे. आपण विरोधी पक्षात असल्याने कुंकळ्ळीच्या बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या पुरवू शकत नाही. त्यामुळे समर्थकांनी पाठिंबा दिल्यास, आपण सुद्धा भाजपात प्रवेश करण्यास तयार आहे, असे आमदार डायस यांनी स्पष्ट केले आहे.
कुंकळ्ळी येथे डायस यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. या सभेत त्यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे सहकारी उपस्थित होते. कॉंग्रेसचे चार आमदार त्यांच्या मतदारसंघात होत नसलेल्या विकासकामांमुळे अस्वस्थ आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असे डायस समर्थकांना सांगितले. आपल्या समर्थकांना आपण कॉंग्रेस पक्ष सोडालेला नको असल्यास आपण त्यांच्या मर्जीबाहेर जाणार नाही, असे डायस स्पष्ट केले आहे.