निसटता विजय मिळवीत पीएमपी ग्रुप संघ विजेता

एचपी ड्रिम वन महिला प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे – डिव्हाईन स्टार तर्फे आयोजित चौथ्या “एचपी ड्रिम वन महिला प्रिमियर लीग (डब्ल्युपीएल)’ अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पीएमपी ग्रुप संघाने एचपी ड्रिम वन संघाचा 11 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.

व्हिजन क्रिकेट ऍकॅडमी मैदानावर झालेला अंतिम सामना हा अतिशय कमी धावसंख्येचा ठरला. साखळी फेरीमध्ये पीएमपी संघाने एचपी संघाचा पराभव केला होता, त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास जास्त होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना पीएमपी ग्रुपने सावध सुरूवात केली. तेजश्री ननावरे (23 धावा), उत्कर्षा पवार (19) आणि श्रावणी देसाई (13) या खेळाडू चांगल्या सुरूवातीनंतरही मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरल्या. पुनम खेमनार हिने 13 धावात 4 गडी बाद करून पीएमपी संघाच्या डावाला खिंडार पाडले. त्यांचा डाव 16.5 षटकात 94 धावांवर संपुष्टात आला.

षटकामागे सहापेक्षा कमी सरासरी धावा करण्याचे आव्हान एचपी ड्रिम वन संघाला होते. संघाला सुरूवातीलाच धक्के बसले त्यांचे दोन फलंदाज 36 धावांवर तंबुत परतले. पुनम खेमनार आणि सायली लोणकर (14 धावा) यांनी तिसर्या गड्यासाठी 49 चेंडूत 40 धावांची भागिदारी करून संघाचा डाव सावरला आणि संघाला विजयाच्या समीप नेले. श्‍वेता खटाळ हिने सायलीला बाद करून ही जोडी फोडली आणि पीएमपी संघाला विजयाचा आशेचा किरण दाखवला. 76 धावांवर 3 गडी बाद अशा सुस्थितीत एचपी संघ होता आणि विजयासाठी केवळ 18 धावांची आवश्‍यकता होती. पण एचपी संघाने 7 धावात पुढील 6 गडी गमावले आणि पीएमपी संघाने विजय खेचून आणला. पुनमने 40 धावांची खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात ती अपयशी ठरली. श्‍वेता खटाळ हिने चमकदार गोलंदाजी करताना 12 धावात 3 गडी बाद केले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक ओन्कार जगताप, पंकज जाधव, हेमंत पाटील, संजीव बोंद्रे आणि सनी मारवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या पीएमपी संघाला आणि उपविजेत्या एचपी संघाला करंडक देण्यात आला.

स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. सर्वोत्कृष्ट फलंदाज हा मान प्रियांका घोडके (ऍडोर मारव्हलस्‌) हिला मिळाला. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही दोन्ही पारितोषिके सायली लोणकर (एचपी ड्रिम वन) हिने पटकावले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुनम खेमनार (एचपी ड्रिम वन) हिची निवड करण्यात आली. फेअर प्ले पारितोषिक ऑक्‍सीरीच स्मॅशर्स संघाला देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.