नगर (प्रतिनिधी) – दैनिक प्रभातच्या वतीने येत्या सोमवारी (ता. 14) नगरमध्ये राज्यस्तरीय जेन्टस् हेअरकट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्ट, अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक असोसिएशन व महाराष्ट्र नाभिक महामंडळ, अहमदनगर यांनी त्यासाठी पुढाकार घेवून नियोजनाची धुरा सांभाळली आहे. नगर जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची अनोखी स्पर्धा होत असल्याने नाभिक व्यावसायिकांसह सर्वानांच त्याबाबत उत्सुकता आहे.
मुंबई येथील वॉल इंडिया ग्रुमिंग प्रॉडक्ट, नगरमधील माय केअर, प्रशांत कॉस्मेटीक, बापू एजन्सीज, समीर कॉस्मेटीक, समर्थ कॉस्मेटीक, जय बाबा कॉस्मेटीक या दालनांतर्फे स्पर्धेचे प्रायोजकत्त्व स्वीकारण्यात आले आहे. मीडियम ते लॉंग कट हेअरकट (वेळ : 30 मिनिटे) व क्रिएटिव्ह फेड ऍण्ड टॅटू हेअरकट (वेळ : 45 मिनिटे), अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा होईल.
दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून एकत्रितपणे पहिल्या तीन क्रमांकाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकास 15 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास 11 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व तृतीय क्रमांकास साडेसात हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यातआले.
याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सहभागी स्पर्धक व उपस्थित राहणाऱ्या नाभिक व्यावसायिकांमधूनही दहा भाग्यवंतांची निवड करण्यात येणार आहे. त्यांनाही बक्षिसे देण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे परीक्षकच करतील स्पर्धेचे परीक्षण..!
दैनिक प्रभाततर्फे आयोजित या राज्यस्तरीय जेन्टस् हेअरकट स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे परीक्षक करणार आहेत. त्यात सचिन टक्के (मुंबई), सयाजी झुंजार (कोल्हापूर), सिद्धार्ध अनारसे (मुंबई), शंकर डांगे (सांगली), मनीष शिंदे व महेश मोरे (नगर) आदी सहा परीक्षकांचा समावेश आहे.
सकाळी उद्घाटन अन् सायंकाळी बक्षीस वितरण..!
सोमवारी (ता. 14) सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता या स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. तपोवन रस्त्यावरील तपोवन मंदिरासमोर असलेल्या श्री संत सेना महाराज सांस्कृतिक भवनातच उद्घाटन सोहळ, राज्यस्तरीय स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा होईल.