पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या उपनगरे आणि गावांना जोडणारी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. येत्या 12 तारखेपासून नव्याने 12 मार्गांवर 70 बसेसद्वारे सेवा देण्यात येणार आहे. पीएमपीची सेवा पुणे जिल्ह्यात विस्तारणार असल्याने ग्रामीण भागातून शहरांत येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत मर्यादित असणारी पीएमपीची सेवा ग्रामीण भागात विस्तारत आहे. यासाठी प्रशासनाकडे स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील मिळून 2 हजारपेक्षा अधिक बसेस आहेत. तर मागील काही महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड लगतच्या औद्योगिक क्षेत्रात आणि ग्रामीण भागातदेखील बससेवा सुरू होत होती.
यासह पीएमआरडीएच्या हद्दीपर्यंत बससेवा सुरू करण्यास पीएमपी संचालक मंडळानेदेखील मान्यता दिल्याने बससेवा विस्तारण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ग्रामीण भागात 12 मार्गांवर बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.
या मार्गांवर धावणार बस
दर 15 मिनिटांनी हडपसर – घोरपडी, दर 20 मिनिटांनी चाकण – शिक्रापूर, चाकण – तळेगाव दाभाडे, सासवड -जेजुरी, दर 25 मिनिटांनी डेक्कन – भुगाव (तांगडे मळा), दर 30 मिनिटांनी कात्रज – सारोळा, हडपसर – फुरसुंगी – हडपसर (वर्तुळ), पिंपरी रोड – स्पाईन मॉल, वाघोली – रांजणगाव, दर 35 मिनिटांनी पिंपरी रोड – वारजे माळवाडी, 40 मिनिटांनी हडपसर – यवत, दर 1 तासाने वाघोली -राहू या मार्गांवर बसेस धावणार आहेत.
12 डिसेंबरपासून 12 नव्या मार्गांवर बससेवेचे नियोजन केले आहे. कात्रज, हडपसर, वाघोली, हडपसर आदी उपनगरांतून बसेस धावणार असून, रांजणगाव, जेजुरी एमआयडीसी, यवत, सारोळा आदी भागांत सेवा सुरू करण्यात येणार आहेत. याद्वारे नवीन भाग आणि प्रवासी शहराशी जोडण्याचा प्रयत्न आहे.
– डॉ. राजेंद्र जगताप, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी