मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सक्रिय रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासांत एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात 1323 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 77,43,513 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.96% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे.
आज राज्यात ३०८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,०४,७०९ झाली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक दैनंदिन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्याच्या तुलने मुंबईत जवळपास सत्तर टक्के रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शुक्रवारी तब्बल १९५६ दैनंदिन करोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ठाणे मनपा २२२, नवी मुंबई मनपा २०१, पुणे मनपा १३५ रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये दैनंदिन करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.