लंडन : श्वान पाळणे हा अनेकांचा शौक आणि छंद असतो. या छंदाचेच रूपांतर अनेक वेळा विक्रमामध्ये सुद्धा होऊ शकते अशाच एका विक्रमी श्वानाचे निधन झाल्याची माहिती आता समोर येत आहे. जगातील सर्वात उंच श्वान म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केलेल्या जेऊस नावाच्या या श्वानाचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले आहे.
बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदीप्रमाणे या श्वानाची उंची तब्बल एक मीटर होती. ग्रेट डेन जातीच्या या श्वानाला 2022 मध्ये जगातील सर्वात उंच श्वान म्हणून दर्जा देण्यात आला होता, त्याचे वय फक्त तीन वर्षांचे होते पण त्याला कॅन्सर झाल्यामुळे अकालीच मृत्यूचा सामना करावा लागला.
ब्रिटनी डेविस नावाच्या एका तरुणीने हा श्वान पाळला होता आणि तो तिचा अत्यंत लाडका होता. मृत्यूसमयीसुद्धा आपल्या मालकीणीच्या मांडीवरच त्याने जगाचा निरोप घेतला जेऊस नावाच्या या सर्वात उंच श्वानाला जेव्हा कर्करोगाचे निदान झाले, तेव्हा त्याच्या पुढच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
या शस्त्रक्रियेनंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे जेऊसला निमोनिया झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जेऊस हा खूप प्रेमळ श्वान होता आणि आमच्या कुटुंबातील सर्वांवर त्याचे मनापासून प्रेम होते. तो घरातील एखाद्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणेच राहत होता अशी माहिती त्याच्या मृत्यूनंतर ब्रिटनी डेविस यांनी दिली आहे.