मुंबई – लॉकडाऊन व निर्बंधाच्या काळातही सरकारी बॅंकांच्या अनुत्पादक मालमत्तेत फारशी वाढ झालेली नाही. त्याचबरोबर या बॅंकांचा नफा वाढत आहे. त्यामुळे बॅंकांच्या शेअरमधील वाढ चालूच असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी स्टेट बॅंक आणि पंजाब अँड सिंध बॅंकेच्या शेअरच्या भावात भक्कम वाढ झाली.
स्टेट बॅंकेला अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे बॅंकेला खराब कर्जापोटी कमी तरतूद करावी लागली आणि बॅंकेचा नफा मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे सोमवारी स्टेट बॅंकेच्या शेअरच्या भावात दोन टक्क्यांनी वाढ झाली. त्याचबरोबर इतर बॅंकांनाही चांगला आधार मिळाल्याचे दिसून आले.
पंजाब अँड सिंध बॅंकेने परवा चमकदार ताळेबंद जाहीर केल्यामुळे आज या बॅंकेच्या शेअरच्या भावात तब्बल सात टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. अनुत्पादक मालमत्तेमुळे गेल्या आठ तिमाहित या बॅंकेला तोटा होत होता. मात्र चौथ्या तिमाहीत या बॅंकेला 161 कोटी रुपयांचा नफा मिळविण्यात यश मिळाले आहे. सरलेल्या पूर्ण वर्षात बॅंकेला 2,732 कोटी रुपयांचा तोटा झाला असला तरी आता बॅंक नफ्यात येत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा या बॅंकेच्या शेअरकडे वळविला असल्याचे दिसून येते.
दरम्यान करोनाचे रुग्ण कमी होत आहेत. त्याचबरोबर लस उपलब्ध करण्यासाठी सरकार हालचाली करत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक परिस्थिती लवकरच रुळावर येईल म्हणून शेअर बाजारात एकूणच खरेदीचे वातावरण होते. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.15 टक्क्यांनी म्हणजे 22 अंकांनी वाढून 15,197 अंकांवर बंद झाला.
हा निर्देशांक 15 हजार अंकांच्या वर स्थिरावल्यामुळे गुंतवणूकदारानी समाधान व्यक्त केले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 111 अंकांनी वाढून 50,651 अंकांवर बंद झाला. स्टेट बॅंकेरोबर एचडीएफसी बॅंक, डॉ रेड्डीज, आयटीसी, ऍक्सिस बॅंक, पावर ग्रीड या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरीव वाढ झाली. मात्र इंडसइंड बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिन्सर्व, टायटन या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
जागतिक बाजारातून संमिश्र संकेत येत असले तरी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी पुढाकार घेऊन शेअरची खरेदी केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे असे रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले.