नवी दिल्ली – करोनावरील लसीची मक्तेदारी असलेल्या फार्मा क्षेत्रातील कंपन्यांची मालकी ज्यांच्याकडे आहे किंवा अशा कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणावर ज्यांच्याकडे आहेत असे नऊ नवे अब्जाधीश करोनाच्या साथीमुळे निर्माण झाले आहेत.
करोनाच्या लसींमुळे तयार झालेल्या या नऊ अब्जाधीशांची संपत्ती एवढी आहे की त्यामध्ये जगातील सर्व गरीब देशातील लोकसंख्येचे लसीकरण केले जाऊ शकते, असे पीपल्स वॅक्सिन अलायन्स संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. या सगळ्यांच्या एकत्रित संपत्तीचे मूल्य आहे तब्बल 19.3 अब्ज डॉलर. त्यातून जगभरातील अल्प उत्पन्न गटातील लोकांचे पूर्ण लसीकरण 1.3 वेळा होऊ शकते.
या नऊ नव्या अब्जाधीशांखेरीज आधीपासून अब्जाधीश असलेल्या आठ जणांकडे करोनाची लस असलेल्या कंपन्यांचे भरपूर शेअर आहेत. त्यामुळे या आठ जणांच्या संपत्तीत 32.3 अब्ज डॉलरने वाढ झालेली आहे. एवढ्या रकमेत भारतातील सर्व नागरिकांना लसीकरणाचे दोन डोस मिळू शकतात, असे या अहवालात म्हटले आहे.
पीपल्स वॅक्सिन अलायन्स या संस्थेचे सदस्य असणाऱ्या ऑक्सफॅम आणि ग्लोबल जस्टीस नाऊ आणि यूएनएआयडी यांनी फोर्ब्ज रिच लिस्टच्या आकडेवारीचा अभ्यास करून या मूठभर लोकांनी लसीच्या निर्मितीतून अब्जावधींची संपत्ती कशी जमवली याचे विश्लेषण केले आहे. विशेष म्हणजे या लसनिर्मितीसाठी बहुतेक ठिकाणी स्थानिक सरकारने निधी दिलेला आहे.
ऑक्सफॅमच्या आरोग्य धोरण व्यवस्थापिका अॅना मॅरिऑट म्हणतात, करोनासारख्या अतिशय क्रूर अशा आजाराला रोखण्यातील आपल्या सामूहिक अपयशाची परिणीती म्हणजे अल्पावधीत निर्माण झालेले हे नवे लस अब्जाधीश.
दुसरीकडे आपण जगातील अब्जावधी लोकांना सुरक्षिततेसाठी लस हवी आहे त्यांना ती देऊ शकत नाही. या लसींबाबत मक्तेदारी असलेल्या अनेक फार्मास्युटिकल कंपन्या प्रचंड नफेखोरी करत असून त्या नफेखोरीचा मानवी चेहरा म्हणजे हे अब्जाधीश आहेत. यातील अनेक लसीच्या उत्पादनासाठी स्थानिक सरकारांनी निधी पुरवलेला असल्याने या लसींमधून व्यक्तिगत नफेखोरी करण्याऐवजी त्या पहिल्यांदा जगातील लोकांच्य कल्याणासाठी दिल्या पाहिजेत. या कंपन्यांची ही मक्तेदारी तातडीने संपुष्टात आणण्याची गरज आहे, तरच लसींचे उत्पादन वाढून त्याच्या किंमती कमी होतील आणि जगाचे लसीकरण होईल.
करोनाच्या लसींमधून प्रचंड नफा होईल या अपेक्षेने फार्मास्युटिकल कंपन्यांच्या शेअरच्या किंमती वेगाने वाढत आहेत आणि त्यातूनच हे अब्जाधीश तयार होत आहेत. या महिन्याच्या सुरवातील दक्षिण अफ्रिका आणि भारताच्या पाठिंब्याने अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेकडे प्रस्ताव ठेवला होता की, लसीच्या क्षेत्रातील मक्तेदारी संपवून करोनाच्या लसीवरील स्वामित्व हक्क संपुष्टात आणले जावेत. या प्रस्तावाला सुमारे 100 हून अधिक विकसनशील देशांनी पाठिंबा दिला.
नव्या अब्जाधीशांच्या यादीत मॉर्डनाचे सीईओ आणि बायोएनटेकचे सीईओ आघाडीवर आहेत. त्यांची संपत्ती चार अब्ज डॉलरच्या वर पोचली आहे.
नऊ नवे लस अब्जाधीश
नाव
कंपनी/पद
अंदाजित संपत्ती (अब्ज डॉलरमध्ये)
स्टीफन बॅन्सेल
सीईओ, मॉर्डना
4.3
उगूर साहिन
सीईओ आणि सहसंस्थापक बायोएनटेक
4.0
टिमोथी स्प्रिंगर
प्रतिकारशक्ती तज्ज्ञ आणि मॉर्डनातील गुंतवणूकदार
2.2
नुबार अल्सायन
चेअरमन, मॉर्डना
1.9
जुआन लोपेझ-बेलमॉन्टे
चेअरमन रोवी
1.8
रॉबर्ट लँगर
संस्थापक गुंतवणूकदार मॉडर्ना
1.6
झु ताओ
सहसंस्थापक कॅनसिनो बायोलॉजिक्स
1.3
क्वि डाँग्झू
सहसंस्थापक, कॅनसिनो बायोलॉजिक्स
1.3
माओ हुईनहोआ
सहसंस्थापक, कॅनसिनो बायोलॉजिक्स
1.0
ग्लोबल जस्टीस नाऊ या संस्थेचे धोरण आणि मोहिम विभागातील वरीष्ठ व्यवस्थापक हैदी चाऊ म्हणतात, भारतासारख्या देशांत रोज करोनामुळे हजारो लोक मरत असताना लाखो लोकांची गरज लक्षात न घेता ब्रिटन, जर्मनी आणि अन्य देश मोठ्या फार्मा कंपन्यांच्या अब्जाधीश मालकांचे हितसंबंध जोपसत आहेत हे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे.
आठ नव्या अब्जाधीशांखेरीज गेल्या वर्षा-दोन वर्षात ज्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पूनवाला आणि कॅडिला हेल्थकेअरच्या पटेल यांचा समावेश होतो.
अब्जाधीश कुटुंबांच्या संपत्तीतील वाढ
नाव
2020 मधील संपत्ती (अब्ज डॉलर)
2021 मधील संपत्ती
(अब्ज डॉलर)
जिआंग रेंगशेंग व कुटुंबिय.
झिफेई बायोलॉजिकल प्रॉडक्टस्
7.6
24.4
सायरस पूनावाला
संस्थापक, सिरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया
8.2
12.7
त्से पिंग, सायनोफार्म
7.3
8.9
वु ग्वानजियांग, सहसंस्थापक, झिफेई बायोलॉजिकल प्रॉडक्टस्
1.8
5.1
अँड्रियाज स्ट्रुंजनमॅन अँड फॅमिली
9.6
11.0
थॉमस स्ट्रुंजनमॅन अँड फॅमिली, बायोएनटेक
9.6
11.0
पंकज पटेल, कॅडिला हेल्थकेअर*
2.9
5.0
पॅट्रिक सून, शिआँग इम्यनिटी बायो
6.4
7.5
ही कंपनी करोनावरील रेमडेसिवीरसारख्या औषधांचे उत्पादन करते. कंपनीच्या झिकॉव्ह-डी या लसीच्या चाचण्या सुरु आहेत.
ही संपत्तीतील वाढ अद्यापही कागदावरील असून लसीची वाढती मागणी लक्षात घेऊन संबंधित कंपन्यांचे मूल्यांकन वाढल्याने ती वाढ गृहीत धरून होणारा अपेक्षित नफा लक्षात घेऊन ही आकडेवारी दाखवण्यात आलेली आहे. पुन्हा या लसींच्या स्वामित्व हक्कांसाठीच्या संरक्षणामुळे अब्जाधीशांच्या संपत्तीला आणखी चमक आली आहे.
( अहवाल पीपल्स फॉर व्हॅक्सिनने जारी केलेल्या पत्रकांवरून देण्यात आलेली आहे.)