नवी दिल्ली -जागतिक चलन बाजारात डॉलर कमकुवत होत आहे. अमेरिकन रोख्यावरील परतावा कमी होत आहे. त्याचबरोबर रुपयाच्या मूल्यात घट झाल्यामुळे सोन्याच्या दरातील वाढ चालूच आहे. सोन्याचे दर सध्या चार महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 95 रुपयांनी वाढून 48,015 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 154 रुपयांनी वाढून 70,998 रुपये प्रति किलो झाला. रुपयाचा दर चार पैशांनी कमी झाल्याचे दिसून आले. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,882 डॉलर तर चांदीचा दर 27.67 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
सोन्याचा दर वाढत असल्याबद्दल एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर कमकुवत असल्यामुळे सोने वाढत आहे. त्याचबरोबर रुपया कमकुवत झाल्यामुळे भारतात सोन्याच्या दरात वाढ होत आहे.ते म्हणाले की, लवचिक आर्थिक परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सोन्याचा आधार घेत आहेत. त्याचबरोबर महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याला भाव मिळत आहे.