नवी दिल्ली – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सूचित केले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून, प्रत्येक निवडणूक बाँड खरेदीची तारीख, खरेदीदाराचे नाव आणि खरेदी केलेल्या इलेक्टोरल बाँडचे मूल्य हा सगळा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे.
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, बँकेने इलेक्टोरल बाँड्सच्या रोखीकरणाची तारीख, योगदान मिळालेल्या राजकीय पक्षांचे नाव याचा सर्व तपशील यात सादर करण्यात आला आहे.
१२ एप्रिल२०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खरेदी केलेल्या आणि रिडीम केलेल्या बॉण्ड्सच्या संदर्भातील हा डेटा आहे. या कालावधीत एकूण २२.२१७ रोख्यांची खरेदी करण्यात आली.
१ एप्रिल ते ११ एप्रिल २०१९ पर्यंत एकूण ३३४६ निवडणूक रोखे खरेदी करण्यात आले आणि एकूण १६०९ बॉण्ड्सची पूर्तता करण्यात आली, असे प्रतिज्ञापत्रात एसबीआयने नमूद केले आहे.
१२ मार्चपर्यंत ही सारी माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला होता. त्याची पुर्तता आम्ही केली आहे असे एसबीआयने म्हटले आहे.
या आधी बँकेने हा तपशील सादर करण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ मागितली होती. पण ती फेटाळण्यात आली. आता १५ मार्चला सायंकाळी ५ वाजेपर्यंंत हा तपशील वेबसाईटवर जारी करण्याची सुचना सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिली आहे.
आता त्या पातळीवर त्याची अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे. त्यातही सरकारकडून काही अडथळा आणला जाण्याची शंका काही जणांनी व्यक्त केली आहे.