पुणे – जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून (दि.27) सुरुवात होणार आहे. हे अर्ज संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत भरता येणार आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
विधानसभेच्या निवडणुकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी राम यांनी दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.
कार्यालय शोधू कुठे…
शहरात विधानसभेच्या 8 मतदारसंघांचा समावेश होतो. प्रत्येक मतदारसंघासाठी त्या-त्या भागात स्वतंत्र कार्यालय स्थापन केले जाते. याच कार्यालयातून उमेदवारी अर्ज स्विकारणे, अर्जांची छाननी आदी कामकाज चालते. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून काही विधानसभा मतदारसंघांचे कार्यालय बदलले आहेत. त्यामुळे कोणत्या मतदारसंघाचे कार्यालय कुठे आहे, याबाबतची विचारणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होत आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय शोधण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे.