सातारा – महाबळेश्वरच्या वेण्णा लेक रस्त्याच्या अडचणी दूर करुन पर्यायी रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे. पाचगणी- महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पर्यटकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याबाबत पोलीस विभागाने अंमलबजावणी करावी. तसेच पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यालगत अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा देऊन अतिक्रमण काढावे यासाठी मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
महाबळेश्वर व तापोळा परिसरातील पयर्टन विकासाच्या अनुषंगाने करावयाच्या विविध विकास कामांचा राज्य उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी देसाई बोलत होते. बैठकीस खासदार डॉ. शिंदे, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे दूरदृष्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महाबळेश्वर येथील साबणे रोड सुशोभिकरणाबाबत तेथील व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असल्याचे सांगून देसाई म्हणाले, “”साबणे रोड सुशोभीकरणासाठी दोन्ही बाजूंच्या गटारांवरील अतिक्रमण काढून ती जागा सुशोभीकरणासाठी अंतिम करावी. महाबळेश्वर- तापोळा रस्ता निविदा अंतिम करुन कामाला सुरुवात करावी. तापोळा ते अहिर या पुलाचे काम लवकरात लवकर करावे. तापोळा परिसर पर्यटन क्षमतावाढीबाबत 4.17 कोटींचा पर्यटन विकास आराखडा प्रादेशिक पर्यटन कार्यालयास सादर करण्यात आला आहे. यामधून तापोळा परिसरातील विकास कामे करण्यात येणार आहे. दरे येथील उत्तेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्रास ब वर्गाचा दर्जाबाबतचा शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल. उतेश्वर तीर्थक्षेत्रासाठी मंजूर झालेल्या निधीतून विकास कामे हाती घेण्यात यावीत.”
महाबळेश्वर- तापोळा रस्त्याचे काम लवकर सुरू करा : डॉ. श्रीकांत शिंदे
खासदार डॉ. शिंदे म्हणाले, “महाबळेश्वरच्या साबणे रोड सुशोभीकरणाचा आराखडा चांगल्या पद्धतीने तयार करावा. महाबळेश्वर ते तापोळा रस्त्याचे काम लवकर सुरु होईल यासाठी प्रयत्न करावेत. वन विभागाच्या जागेबाबत काही अडचणी असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. तापोळा येथे नव्याने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. दरे गाठवण विस्तारवाढीसाठी कार्यवाही करावी. दरे येथील नागरिकांची घरे मातीची आहेत त्यांना आवास योजनेचा लाभ देवून पक्के घरे बांधून द्यावीत.” तापोळा व दरे गावठाणचा विषय जिल्हा प्रशासनाने मार्गी लावावा, अशा सूचनाही डॉ. शिंदे यांनी केल्या.