तात्काळ छावण्या सुरु करा

पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या सुचना
मलवडी  –
पालकमंत्री म्हणून मी छावण्यांची जबाबदारी स्विकारण्यास तयार आहे. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरु करा. उर्वरित वीस छावण्या सुरु करा, तसेच नवीन दहा गावांसाठी सक्षम संस्थांना बोलावून चारा छावण्या सुरु कराव्यात अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केल्या.

पालकमंत्री शिवतारे यांनी पिंगळी बुद्रुक (ता. माण) येथे चारा छावणी पाहणी केली तसेच पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी आमदार जयकुमार गोरे, हरणाई सूत गिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर, भाजपचे रणधीर जाधव, शिवसेनेचे अनिल सुभेदार, रासपचे बबन विरकर, जिल्हा नियोजनचे सदस्य गोविंद शिंदे, पृथ्वीराज गोडसे, राजूभाई मुलाणी, केशवराव वणवे, जिल्हा परिषद साताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पशु संवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, उप विभागीय कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा पाटील, तहसिलदार बाई माने, तहसिलदार अर्चना पाटील, गट विकास अधिकारी गोरख शेलार, गट विकास अधिकारी रमेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री शिवतारे म्हणाले, छावणी सुरु होणे ही शासनाची जबाबदारी आहे. जाचक अटी न ठेवता लवकर छावण्या कशा सुरु करता येथील ते पहा. जे चारा छावणी चालक चार दिवसात चारा छावणी सुरु करणार नाहीत त्यांची परवानगी काढून घेवून जे सध्या चारा छावणी चालवत आहेत त्यांना ती चारा छावणी चालविण्यास परवानगी द्या. जनावरांचा खर्च छावणी चालकांवर येणार नाही याची काळजी घेण्यात येईल. पाणी भरणा केंद्रावरुन छावणीतील जनावरांसाठी लागणारे पाणी देण्यात येईल. जिल्हा बॅंक, मोठ्या पतसंस्था, साखर कारखाने यांना छावणी चालवण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी यापुढे प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार जयकुमार गोरे म्हणाले, पाऊस पडला नसल्यामुळे अजून किती दिवस छावण्या सुरु ठेवाव्या लागतील हे सांगता येत नाही. परिस्थिती गंभीर असून त्यानुसार नियोजन करण्याची गरज आहे. रणजितसिंह देशमुख यांनी पाण्याची व्यवस्था केली तरच छावण्या चालविणे शक्‍य आहे असे सांगितले. मामूशेठ विरकर यांनी छावणी चालकांच्या समस्या मांडल्या. यावेळी माणमधील छावणी चालक तसेच पशुपालक उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.