जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा वाढण्यास प्रारंभ

पश्‍चिमेकडे संततधार सातारा शहरात पावसाचा लपंडाव सुरू
राज्यात पाऊस जोर धरणार

सातारा –  सातारा शहरासह परिसरात पावसाचा लपंडाव सुरूच आहे. मात्र, जिल्ह्याच्या पश्‍चिमेला पावसाची संततधार सुरू झाली असून जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाला सुरूवात झाली असली तरी शहर व परिसरात दरवर्षीप्रमाणे पावसाचा जोर वाढताना दिसत नाही. उलट सोमवारी दुपारी अर्धा तास वगळता अधूनमधून पावसाची रिमझिम सुरू राहिली. दरम्यान, रविवारप्रमाणे सोमवारी ही दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर काही मिनिटे हलक्‍या सरी कोसळल्यानंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. मात्र, सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुन्हा रिमझिम पावसाला सुरूवात झाली.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेला पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे कोयना, धोम, कण्हेर. धोम बलकवडी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत आहे. 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात पाच दिवसांपूर्वी 10.89 टीएमसी पाणीसाठा होता. एक जुलैच्या सायंकाळी कोयना धरणात 14.16 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याचप्रमाणे उर्वरित धरणांमध्ये देखील काही प्रमाणात वाढ होत आहे.

सद्यस्थितीत 13.50 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या धोम धरणामध्ये 1.96 टीएमसी, 10.10 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कण्हेर धरणामध्ये 1.82 टीएमसी, 4.08 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या बलकवडी धरणात 0.43 टीएमसी, 9.96 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या उरमोडी धरणात 1.05 टीएमसी, 5.85 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या तारळी धरणामध्ये 1.75 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत असून त्यामुळे धरणातील पाणीसाठी वाढण्यास मदत होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)