अकोले तालुक्‍यात चारा छावणी, टॅंकर सुरु करा

  • आमदार पिचड यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
  • चुकीच्या नियोजनामुळे “धरण उशाला कोरड घशाला’ म्हणण्याची वेळ

नगर: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट असून इतर सर्वत्रच पाणी व चाऱ्याचा प्रश्‍न उद्भवत आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे अकोले तालुक्‍यात पिण्याचे पाणी व पशूधनासाठी चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्‍यातील काही गावांमध्ये तातडीने टॅंकर व पशूधनासाठी पशूखाद्य व चाऱ्याची मागणी आमदार वैभव पिचड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

आ. पिचड यांनी अकोले तालुक्‍यातील विविध प्रश्‍नांबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेवून चर्चा केली. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तालुक्‍यातील समशेरपूर, देवठाण, अकोले, कोतुळ, ब्राम्हणवाडा, राजूर, शेंडी, साकीरवाडी या गावांमध्ये 28 फेब्रुवारी रोजी प्रशासनाने दुष्काळ जाहिर केलेला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. तसेच भंडारदरा व निळवंडे धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना जनावरांसाठी चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

प्रशासनाने अकोले तालुक्‍यात जनावरांची एकही छावणी सुरु न केल्याने अनेक जनावरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. दुष्काळ जाहिर होवूनही जनावरांसाठी चारा व पशुखाद्य उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे अकोले तालुक्‍यातील पशुधन वाचविण्यासाठी शासनाने तातडीने चारा व पशुखाद्य उपलब्ध करुन देण्याची मागणी पिचड यांनी केली. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. मागील आवर्तनात सोडलेल्या पाण्यामध्ये पुर्वेकडील गावांनी साठवण तलाव भरुन घेतलेले आहेत. परंतु जलसंपदा विभागाने पाण्याच्या पाण्याचे चुकीचे नियोजन केल्यामुळे उन्हाळ्यात टंचाई निर्माण झालेली आहे. तसेच तालुक्‍यातील प्रवरा नदीचे पात्र कोरडे झाले आहे. त्यामुळे धरण उशाला अन कोरड घशाला अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. असे पिचड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई तातडीने द्या

अकोले तालुक्‍यातील समशेरपूर, देवठाण, अकोले, कोतुळ, ब्राम्हणवाडा या महसूल मंडळामधील गावांमध्ये शासनाने 8 जानेवारी रोजी व राजूर, शेंडी, साकीरवाडी या महसूल मंडळामधील गावांमध्ये 28 फेब्रुवारी रोजी दुष्काळ जाहिर केला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली असून आदिवासी भागातील मुख्य पिक असलेले भात, नाचणी, भुईमुग आदी पिके फुलोऱ्यात असतांना जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने दुष्काळ जाहिर झाल्यानंतर पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अनुदान देण्यात येते, पंरतु तालुक्‍यात दुष्काळ जाहिर होवून चार महिने उलटुनही शेतकऱ्यांना शासनाकडून पिक नुकसान भरपाई मिळालेली नाही. दुष्काळाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी लवकरात लवकर प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार वैभव पिचड यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here