कर्तारपुर कॉरिडॉर विषयीची चर्चा ठप्प

लाहोर – शिख भाविकांसाठी पाकिस्तानातील कर्तारपुर ते भारत असा जो कॉरिडॉर उभारला जाणार आहे त्याच्या उभारणीतील तांत्रिक बाबींवरील चर्चेत काही अडथळे निर्माण झाल्याने या विषयीची चर्चा काहीशी ठप्प झाली आहे. या कॉरिडॉर मार्गात रावी नदीचे पात्र आड येत असून तेथे पुल बांधण्यावरून या चर्चेचे घोडे अडले आहे. दोन्ही देशांच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या समितीच्या बैठकीत या विषयावर एकमत होऊ शकले नाही. दोन्ही देशांच्या तज्ज्ञांच्या समितीची काल सोमवारी एक बैठक झाली.पण त्यात यावर कोणताच तोडगा निघू शकलेला नाही.

ही बैठक केवळ तासभरच चालली. यावेळी दोन्ही बाजूंनी कॉरिडॉर उभारणीचा तांत्रिक तपशील एकमेकांना सादर केला. या नदी पात्रात एक किमी लांबीचा पुल उभारण्याची सुचना भारताने केली तर तेथे केवळ रस्ता पुरेसा आहे असे पाकिस्तानी बाजूचे म्हणणे पडले. तथापी भारताने रस्त्याच्या प्रस्तावाला आक्षेप घेतला. रावी नदीच्या पात्रात पुर आला तर या रस्त्याचा काही उपयोग नाही असे भारताचे म्हणणे होते. तथापी त्याला उत्तर देताना पाकिस्तानी बाजूंकडून सांगण्यात आले की तेथे एक धरण बांधून पुराचे पाणी नियंत्रीत करता येईल आणि रस्त्याची उंची नदी पात्रात वाढवून पुराच्या पाण्याचा धोका टाळण्यात येऊ शकेल. या मुद्‌द्‌यावर बैठक अनिर्णीत राहिली.

बैठकीची पुढील तारीख ठरवण्यातही अपयश आले. कॉरिडॉरचे बांधकाम करण्याबाबत या आधी एक सर्व सहमती झाली आहे. त्यानुसार पाकिस्तानी हद्दीतील बांधकाम पाकिस्तानने करावे आणि कॉरिडॉरचे भारतीय हद्दीतील काम भारताने करावे असे ठरले आहे. भारतातील डेराबाबा नानक आणि पाकिस्तानातील गुरूद्वारा दरबारा साहिब या दरम्यान हा कॉरिडॉर बांधला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here