जामखेड – गेल्या २७ वर्षांपासून सुरू असलेली तालुक्यातील जवळा ते नगर ही एसटी बस गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ही बस चालू करण्यासाठी पिंपरखेडचे सरपंच व ग्रामस्थांनी जामखेड आगारप्रमुख यांनी निवेदन देऊन बस पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र ओमासे, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे आदींसह ग्रामस्थांनी आगारप्रमुख यांना निवेदन दिले. जामखेड तालुक्यातील जवळा येथून जवळा ते अहमदनगर ही एसटी बस प्रवाशी व विद्यार्थीसाठी गेल्या २७ वर्षांपासून सुरू होती. मात्र, ही बस महामंडळाकडून गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. परिणामी जवळा, हळगाव, पिंपरखेड, हसनाबाद, अरणगावमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशी व विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. या बसने प्रवास करणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांकडे बसचे मासिक पास आहेत. मात्र, सध्या सर्व विद्यार्थी हे खासगी बसने प्रवास करत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे बंद करण्यात आलेली जवळा ते नगर एसटी बस लवकरात लवकर सुरू केली नाहीतर पिंपरखेड ग्रामस्थ व प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.