पुणे – क्षयरोग प्रतिबंधात्मक थेरपी तपासून पाहण्यासाठी वन टू थ्री एचपी हा अभ्यास केला जाणार आहे. बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांच्या विद्यमाने हा अभ्यास केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सुचवल्याप्रमाणे अति-कमी कालावधीच्या टीबी प्रतिबंधात्मक थेरपीचा स्वीकार तपासून पाहण्यासाठी हा अभ्यास करण्यात येत आहे.
एचआयव्ही असणाऱ्या व्यक्तींना, या अभ्यासात दोन ठराविक औषधे दररोज एक महिन्यासाठी (१ एचपी )आणि तुलनेत आठवड्यातून एकदा, असे तीन महिन्यांसाठी (तीन एचपी ) हे दिले जाणार आहे. यामध्ये औषधांचे पालन करून उपचार पूर्ण होण्याच्या दृष्टीने ३एचपी च्या तुलनेत १एचपी जास्त श्रेष्ठ आहे की नाही, हे निर्धारित केले जाणार आहे. यामुळे टीबी प्रतिबंधात्मक उपचारांच्या ज्ञानातील महत्वाची दरी भरून काढण्यास हा अभ्यास उपयोगी पडेल, अशी माहिती बी.जे. तील वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्रमुख अभ्यास संशोधक डॉ. रोहिदास बोरसे यांनी सांगितले.
या अभ्यासात २५० एचआयव्ही सह जगणारी, १३ वर्षांवरील मुले आणि प्रौढ व्यक्ती यांचा समावेश करून घेतला जाईल. या अभ्यासाच्या निष्कर्षामुळे राष्ट्रीय टीबी कार्यक्रमाला फायदा होईल, असा दावा करण्यात आला आहे. क्षयरोग पेशंटच्या घरात राहणाऱ्या, एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्ती आणि सहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांच्याकरिता क्षयरोग प्रिव्हेनटीव्ह थेरपी (टीपीटी) ची सुचवलेली आहे. जरी आयपीटीच्या कार्यक्षमतेचे उत्तम पुरावे उपलब्ध आहेत. तरीही भारतासहित जागतिक स्तरावर आयपीटी घेण्याचे प्रमाण किमान आहे. ज्या देशांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे. त्या देशांमध्ये या अभ्यासाचे पुरावे कमी आणि अति-कमी क्षयरोग प्रतिबंधात्मक औषधप्रणाली स्वीकारण्यास मदत करेल.
दोन थेरेपींचा एकत्रित वापर
गेल्या अनेक दशकांपासून, आयसोनिएझेड प्रिव्हेनटीव्ह थेरपी (आयपीटी) क्षयरोगाला प्रतिबंध करण्याकरता वापरली जात आहे. सध्याची राष्ट्रीय नियमावली, एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तींसाठी सध्या सहा महिने आयपीटी सुचवते. रोगप्रतिकारशक्ती, आधीचे क्षयरोग उपचार किंवा गरोदरपणा, लक्षात न घेता, मुले आणि प्रौढांसाठी आयपीटी आणि एआरटीचा एकत्रित वापर सुचवलेला आहे.