पुणे, दि. 24 -राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 150 ई-बस येणार असून, त्यापैकी 68 बस पुणे विभागाला मिळणार आहेत. पुणे विभागातील या बस पुढील महिन्यात दाखल होणार आहेत. त्यानुसार पुण्यातून सहा शहरांत या बस सोडल्या जाणार असून, त्याचे वेळापत्रक देखील एसटी महामंडळाने तयार केले आहे. ई-बस आल्यानंतर एसटीबरोबरच प्रवाशांना फायदा होणार आहे.
राज्यातील पहिली ई-बस पुणे-नगर मार्गावर एक जून रोजी सुरू करण्यात आली आहे. सध्या या मार्गावर दोन बस सुरू असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही बस सुरू करताना एसटी महामंडळाकडून आणखी ई-बस घेऊन पुण्यासह इतर शहरात ई-बस सुरू करण्याचे जाहीर केले होते. एसटी महामंडळाकडून सुरुवातीला 150 ई-बस खरेदी करण्यात येत असून, त्या भाडेतत्वावर चालविल्या जाणार आहेत. यासाठी एसटी महामंडाळाने ओलेक्ट्रा आणि ग्रीनसेल या दोन कंपन्यांबरोबर करार केला आहे. 150 बस पुढील महिन्यांपर्यंत दाखल होणार आहे. त्यापैकी 68 ई-बस पुणे विभागाला मिळणार आहे. पुणे विभागातून या ई-बस दादर, बोरीवली, ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि औरगांबाद या शहरात धावणार आहेत.
ई-बससाठी स्वारगेट विभागीय कार्यालयात 24 चार्जिंग पॉइंट उभारले जाणार आहेत. त्यापैकी नऊ पॉइंट उभारले असून, बाकीचे उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच, पुणे स्टेसन येथे देखील पाच चार्जिंग पॉइंट उभारले जाणार असून, त्या ठिकाणी पुण्यातून प्रवास करणाऱ्या ई-बसला बुस्टर चार्जिंग मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात या ई-बस दाखल झाल्यानंतर पुण्यातून वेगवगेळ्या सहा शहरांत ई-बस सुरू होणार आहेत. एका चार्जिंगमध्ये ही ई-बस 300 किलोमीटर धावणार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्याबरोबरच प्रवाशांना कमी किमतीमध्ये एसीचा प्रवास मिळणार आहे.
एसटी महामंडळाला 150 बस मिळणार असून, त्यापैकी 68 बस पुणे विभागाला मिळणार आहे. या बस पुढील महिन्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे पुण्यातील तीन स्थानकावरून सहा शहरात ई-बस सेवा सुरू केली जाणार आहे.
-ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक व्यवस्थापक, पुणे विभाग
मार्गाचे नाव आणि
ई-बसची संख्या
स्वारगेट ते दादर -12
पुणे स्टेशन ते दादर -12
स्वारगेट ते बोरीवली -12
स्वारगेट ते ठाणे -12
वाकडेवाडी ते नाशिक -9
स्वारगेट ते कोल्हापूर -6
वाकडेवारी ते औरंगाबाद -5