नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील न्यायालयाने संदेशखळी येथील तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख याला पहाटे मिनाखान येथून अटक केल्यानंतर शेखला सकाळी 10.40 वाजता बशीरहाट न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राज्य पोलिसांनी शेखला १४ दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली होती.
५ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे सुमारे एक हजार लोकांच्या जमावाने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर हल्ला केला. राज्यातील कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या तपासासंदर्भात ते शेख यांच्या आवारात छापा टाकण्यासाठी गेले होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतर शाहजहान शेख फरार झाला होता. संदेशखळी परिसरातील लोकांनी शेखच्या अटकेच्या मागणीसाठी हिंसक आंदोलनही केले होते.
भारतीय जनता पार्टी (भाजप) पश्चिम बंगाल युनिटचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी बुधवारीच दावा केला होता की शाहजहान शेख रात्रीपासून राज्य पोलिसांच्या ‘सुरक्षित कोठडीत’ आहे. तर सत्ताधारी टीएमसीने शुभेंदूचा दावा ‘निराधार’ आणि ‘कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न’ म्हणून फेटाळून लावला होता आणि शेखला पकडण्यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते.
कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी निर्देश दिले होते की पश्चिम बंगाल पोलिसांव्यतिरिक्त संदेशखळी येथील महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी शाहजहान शेख यालाही केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) अटक करू शकते. अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरुन राज्याच्या एडव्होकेट जनरलच्या अर्जावर न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशाचे स्पष्टीकरण दिले. त्यानुसार पोलिसांना शेखला अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शाहजहान शेखचे काका मुस्लेम शेख हे सीपीएमचे नेते आहेत. शाहजहान शेख याने त्याच्या राजकीय कारकिर्दीला सीपीएममधून सुरुवात केली. २०११ मध्ये सीपीएम सत्तेतून बाहेर पडल्यानंतर शाहजहानने पक्ष बदलला. तो २०१३ मध्ये टीएमसीमध्ये दाखल झाला. २०१८ मध्ये तो अग्रहाटी ग्रामपंचायतीचा उपप्रमुख झाला. २०२३ च्या पंचायत निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे १७ वाहने, १४ एकर जमीन आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न २० लाख रुपये आहे. शाहजहान शेखने २००० सालापर्यंत कंडक्टर, भाजीविक्रेता आणि ड्रायव्हर म्हणूनही काम केले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. काकांच्या देखरेखीखाली त्यांनी मासळीचा व्यवसायही सुरू केला होता.
शहाजहान शेखवरचे आरोप
२०१९ : भाजपच्या 3 कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप; भूसंपादनात मनी लाँड्रिंग प्रकरण
२०२० : वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना जीवघेणी मारहाण
२०२२ : रेशन घोटाळ्यात ईडी खटला
२०२४ : महिलांचे लैंगिक शोषण; जमीन बळकावल्याचे प्रकरण; ईडी अधिकाऱ्यांना मारहाण