कोलोंबो – श्रीलंकेतील न्यायालयाने माजी तुरुंग आयुक्तांना 2012 मधील एका प्रकरणावरून फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2012 साली वेलिकदा कारागृहात झालेल्या दंगलीमध्ये 27 कैद्यांची हत्या झाली होती. त्याप्रकरणी कोलोंबो उच्च न्यायालयाने माजी तुरुंग अधिक्षक एमिल रंजन लामाहेवा यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील आणखीन एक आरोपी असलेले नार्कोटिक्स ब्युरोचे तत्कालिन निरीक्षक नाओमल रंगजीवा यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी तीन सदस्यीय पिठासमोर गेल्या 3 वर्षांपासून सुरू होती.
लामाहेवा आणि रंगजीवा यांना 2018 च्या मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर 8 कैद्यांची हत्या, कारस्थान आणि संघर्ष दडपला जात असताना बेकायदेशीर मार्गांनी जमाव एकत्र करणे यासारखे 33 आरोप ठेवण्यात आले होते.
9 नोव्हेंबर 2012 रोजी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या या तुरुंगात झालेल्या दंगलीत 27 कैद्यांची हत्या करण्यात आली होती. तर 20 पेक्षा जास्त कैदी या दंगलीत जखमी झाले होते. प्रमाणापेक्षा जेस्त कैदी भरलेल्या या तुरुंगात पोलिसांच्या विशेष कृती दलाने अमली पदार्थ आणि मोबाईल तुरुंगात आणले गेले असल्याच्या संशयावरून अचानक तपासणीला सुरुवात केली होती. त्याला कैद्यांनी विरोध केल्यावर दंगलीला प्रारंभ झाला होता. या प्रकरणी श्रीलंकेतील मानवी हक्क विषयक संघटनांनी मोठा आवाज उठवला होता. त्यामुळे हे प्रकरण देशपातळीवर खूप गाजले होते.