कोलोंबो – आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला जपानकडून आर्थिक मदत मिळण्याची आशा श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय मित्र देशांना अत्यंत कठीण वेळी आपल्या देशाला आर्थिक पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. टोकियो येथील आशियाच्या भविष्यावरील 27 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला व्हिडिओ कॉलद्वारे संबोधित करताना, ते बोलत होते.
जपानबरोबर श्रीलंकेच्या कर्जाच्या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. जपान हा श्रीलंकेच्या प्रमुख विकास भागीदारांपैकी एक राहिला आहे आणि आम्हाला आशा आहे की जपानकडून निधी मिळवून देण्याबाबत सध्या सुरू असलेल्या वाटाघाटी लवकरच पूर्ण होतील. आम्ही आमची अर्थव्यवस्था आणि आमचे राष्ट्र स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यावेळी जपान श्रीलंकेला पाठिंबा देईल, अशी आशा आहे. जपानशी लवकर कराराची आशा आहे असे अध्यक्ष म्हणाले.
राजपक्षे यांनी कोविड-19 च्या साथीपासून श्रीलंकेला भेडसावणाऱ्या अडचणींची रूपरेषा सांगितली. गेल्या दोन वर्षांत कोविड-19 मुळे पर्यटन उद्योग बंद पडले. परदेशी आवक तीव्र घटली आणि श्रीलंकेच्या कर्जाच्या मोठ्या थकबाकीसह इतर कारणांमुळे वाढती महागाई यामुळे गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. असे ते म्हणाले. दरम्यान, श्रीलंकेत हाहाकार माजला आहे. प्रचंड अन्नटंचाई भासत आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.