दुबई – श्रीलंका क्रिकेट मंडळातील कथित गैरव्यवहारामुळे आयसीसीने त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. मात्र, त्याचे नुकसान त्यांच्या खेळाडूंना होऊ नये यासाठी त्यांना द्विपक्षीय मालिका तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची परवानगी आयसीसीने दिली आहे. हीच सुट लाभदायक ठरवत बीसीसीआयने पुढील वर्षी जुलैमध्ये भारतीय संघ श्रीलंका दौरा करणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर श्रीलंका संघ इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची द्विपक्षीय मालिका खेळणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताच्या या दौऱ्यामुळे श्रीलंका क्रिकेटला नवसंजीवनी मिळेल. वेस्ट इंडिज व अमेरिकेत पुढील वर्षी होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. आयसीसीने याच महिन्यात श्रीलंका क्रिकेट मंडळावर बंदी घातली होती. मात्र, ते द्विपक्षीय मालिकेत भाग घेऊ शकतात, ज्याचा संघाला फायदा होणार आहे.
सरकारी हस्तक्षेप तसेच आयसीसीच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यामुळे त्यांच्या मंडळावर आयसीसीने बंदी घातली आहे. त्यामुळे 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेचे त्यांच्याकडील यजमानपदही काढून गेण्यात आले होते व ते दक्षिण आफ्रिकेला बहाल केले गेले. मात्र, बंदी असूनही श्रीलंकेच्या पुरुष आणि महिला संघांना द्विपक्षीय मालिका खेळण्यास आयसीसीने परवानगी दिली आहे.
श्रीलंका मंडळाने जाहीर केलेल्या 2024 सालच्या वेळापत्रकानूसार भारतीय संघ जुलै-ऑगस्ट दरम्यान एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेत जाणार आहे. श्रीलंकेचा माजी अर्जुन रणतुंगाने बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यावर आरोप करत तेच श्रीलंकेचे क्रिकेट चालवतात, सगळे निर्णय तेच घेतात असे म्हटले होते. मात्र, त्यानंतरही भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मालिका
श्रीलंकेचा संघ पुढील वर्षी तब्बल 52 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. या कालावधीत संघ 10 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 21 टी-20 सामने खेळणार आहे. त्यात टी-20 विश्वकरंडकातील सामन्यांचा समावेश केलेला नाही. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर श्रीलंका संघ इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. तर त्यानंतर श्रीलंका संघ नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे.