बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले आहेत आणि दोन्ही गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आमचाच असल्याचा दावा करीत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. सध्या सुनावणी अंतिम टप्यात सुरू आहे मात्र दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपले म्हणणे मांडण्याचे काम सुरू आहे.
दोन्ही गट आपल्या परीने पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच राहील, असे सांगत आहे मात्र आज सुप्रिया सुळे यांनी एका जाहीर सभेत म्हटले आहे की, तुम्हाला पक्ष आणि चिन्ह घ्यायचा आहे का घ्या.. देवाने पांडुरंगाने डोळे दिलेत, कान दिलेत, बुद्धी दिली आहे. सगळं शाबूत आहे. शून्यातून विश्व निर्माण करू आणि रामराज्य आणू, असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामतीतील वाणेवाडी (ता. ३०) या ठिकाणी जाहीर सभेत केले आहे.
“देणे मे जो मजा है, वो लेने मे नही” लढाई आम्ही तत्त्वाशी करत आहोत पक्षाच्या स्थापनेचा कोणी माणूस लढला असता तर ते आम्ही मान्य केलं असतं. लढाई आम्ही लढूच. मात्र यात विघ्न आणायचं काम केंद्रातली अदृश्य शक्ती करत आहे, असा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि अजित पवार गटावर केला आहे.