कोलंबो: श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब नौदलाच्या त्रिंकोमाली नौदल तळावर प्रचंड लष्करी सुरक्षेदरम्यान लपले आहे. सोमवारी, हजारो निदर्शकांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाला वेढा घालत घरात अनेक पेट्रोल बॉम्ब फेकले. एवढेच नाही तर आंदोलकांनी घराबाहेर लावलेली वाहने जाळली.
आंदोलकांना हटवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानातून गोळीबार करावा लागला. मंगळवारी सकाळी श्रीलंकेच्या लष्कराने कडेकोट सुरक्षेत महिंदा राजपक्षे यांना त्यांच्या घरातून बाहेर काढले. आंदोलकांची महिंदा राजपक्षे यांना ठार करण्याची योजना होती, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांनी सांगितले की, श्रीलंकेतील हिंसक निदर्शनादरम्यान, महिंदा राजपक्षे यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने देशाच्या ईशान्य भागातील त्रिंकोमाली नौदल तळावर नेण्यात आले आहे. दुसरीकडे, आता आंदोलक राजधानी कोलंबोपासून 270 किमी अंतरावर असलेल्या नौदल तळावरही पोहोचले आहेत.
दरम्यान राजपक्षे सरकारने सुरक्षेसाठी हजारो सैनिक आणि पोलिस तैनात केले असून कर्फ्यू लागू केला आहे. महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात सुमारे 200 लोक जखमी झाले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराचाही समावेश आहे.
दुसरीकडे महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतरही लोकांचा रोष शांत झालेला नसून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महिंदा राजपक्षे यांना सकाळीच हजारो आंदोलकांमधून लष्कराने त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढले. यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. “पंतप्रधानांच्या निवासस्थानात किमान 10 पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते,” असे एएफपीने एका उच्च सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले.