कोलंबो: श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले असून ते दिमाखात पुन्हा सत्तेत आले आहेत. निवडणूक आयोगाने आज जे निवडणूक निकाल जाहीर केले त्यात ही बाब स्पष्ट झाली आहे.
225 सदस्यांच्या श्रीलंका संसदेत राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीला तब्बल 145 जागा मिळाल्या असून त्यांच्या मित्र पक्षांनाही 5 जागा मिळाल्या आहेत. या आघाडीला एकूण 59.9 टक्के मते मिळाली आहेत.
राजपक्षे यांच्या पक्षाची लोकप्रियता श्रीलंकेत अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे रानिल विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड नॅशनल पार्टीची पिछेहाट होईल हे अपेक्षितच धरण्यात आले होते. त्यानुसार हा निकाल लागला आहे. या पक्षाला केवळ एकच जागा मिळू शकली आहे. हा त्यांचा सर्वात दारूण पराभव आहे. स्वता विक्रमसिंघे यांनाही कोलंबो जिल्ह्यातून पराभव स्वीकारावा लागला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपक्षे यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी काम केले जाणार असल्याचेही मोदी म्हणाले. याबाबत राजपक्षे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली.
फोनवरून अभिनंदन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. श्रीलंकेतील नागरिकांच्या सोबत दोन्ही देशांमधील अनेक वर्षांपासून असलेले उत्तम संबंध आणि सहकार्य यांना पुढे नेण्यास एकत्र काम करण्यासाठी मी उत्साहित आहे. श्रीलंका आणि भारत हे चांगले मित्र आणि उत्तम सहकारी राष्ट्र आहेत, असेही ते म्हणाले.