पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात चार्टर्ड अकाउंटंट फाउंडेशनच्या परीक्षा होत असल्याने दूरशिक्षणच्या एमकॉम प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा आता 21 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 7 ते 10 डिसेंबर दरम्यान होणार होती.
मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी ही माहिती दिली. दूरशिक्षणच्या बीए, बीकॉम, एमए, एमकॉम, एमबीए या अभ्यासक्रमाच्या परीक्षा 7 डिसेंबरपासून सुरू होत आहे. याबाबतची सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही परीक्षा ऑनलाइनद्वारे प्रॉक्टर्ड पद्धतीने होत आहे.
दरम्यान, सीए फाउंडेशनच्या परीक्षा 6 ते 20 डिसेंबर रोजी होत आहे. त्याच कालावधीत दूरशिक्षण विभागाच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. केवळ एमकॉम प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 21 ते 24 डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र एमकॉम अभ्यासक्रम वगळता अन्य परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.