नवी दिल्ली – कोविडच्या नवीन विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारताने 40 वर्षांपुढील नागरीकांना बुस्टर डोस देण्याच्या प्रस्तावावर आता विचार केला पाहिजे अशी सुचना 28 प्रयोगशाळांच्या संघटनेने भारत सरकारला केली आहे. या संघटनेकडे ओमायक्रॉन संबंधात सरकारला शिफारशी करण्याची जबाबदारी आहे.
या संघटनेने आपले जे बुलेटिन प्रसारीत केले आहे त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे. या संस्थेने करोना विषाणुचे स्वरूप, त्याच्या प्रसाराचा पॅटर्न, त्या विषाणुंमध्ये होणारे बदल याचा सर्वंकष अभ्यास करून त्याची माहिती या बुलेटिन मध्ये दिली आहे. त्या सर्वंकष माहितीच्या आधारेच त्यांनी बुस्टर डोसची शिफारस केली आहे.
अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी या आधीच बुस्टर डोसचा निर्णय जाहीर केला आहे. या नवीन विषाणुने आपल्यात बदल करून नवीन रूप धारण केल्याने त्याची लागण होण्याची शक्यता वाढली आहे असेही या संघटनेचे म्हणणे आहे.
भारतात ओमायक्रॉनचे जे दोन संशयित रूग्ण सापडले आहेत त्यातील एकाचे लसीकरण पुर्ण झाले आहे तरी त्याला याची लागण झाल्याने लसीकरणाचा खात्रीलायक उपयोग होत नाही त्यामुळे बुस्टर डोस महत्वाचा ठरणार आहे.