मुंबई – भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याला मुलाखतीसाठी धमकी दिल्याप्रकरणी प्रख्यात क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्यावर बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी लावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अशी बंदी लावली जाण्याचे संकेत मिळत होते, अखेर बुधवारी बीसीसीआयने ही बंदीची कारवाई केल्याचे जाहिर केले.
मुलाखतीसाठी नकार दिल्याने मजुमदार यांनी साहाला धमकी दिली होती. त्यावेळी साहाने ही गोष्ट बीसीसीआयच्या निदर्शनासही आणून दिली होती. बीसीसीआयने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. तसेच सर्व राज्य संघटनांना मुजुमदार यांना सामन्यासाठी स्टेडियममध्ये परवानगी देऊ नये असेही कळवले आहे.
मुजुमदार यांना भारतात होत असलेल्या सामन्यांसाठी परवानगी दिली जाणार नसून त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी परदेशातही मैदानात प्रवेश दिला जाऊ नये, अशी विनंती बीसीसीआयने आयसीसीकडेही केली आहे.
साहाने 19 फेब्रुवारीला याबात ट्विट केले होते मात्र, त्याने या पत्रकाराचे नाव उघड केले नव्हते. मात्र, बीसीसीआयच्या चौकशी समितीसमोर त्याने नाव उघड केले. तसेच साहाने मुजुमदार यांच्याशी झालेल्या संवादाचे ट्विटही पोस्ट केले होते. साहा याला मुलाखत देण्यासाठी धमकावल्याचे साहाने दिलेल्या माहितीमुळे दिसून आले. साहाच्या ट्विटनंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त करत पत्रकाराचे नाव जाहिर करण्याचे आवाहनही केले होते.